‘..तर एनडीएतून बाहेर पडू’ : एका ‘मित्रा’चा मोदी-शहांना इशारा

शिलाँग : वृत्तसंस्थ – भाजपाला एक एक मित्र पक्ष सोडून जाताना दिसत आहे. अशातच आता मेघालयचे मुख्यमंत्री आणि नॅशनल पीपल्स पार्टीचे अध्यक्ष कॉनराड संगमा यांनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. आम्ही लवकरच एनडीएतून बाहेर पडू, असं विधान त्यांनी केलं आहे. दरम्यान संगमा यांनी घेतलेली भूमिका राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाल्याचे दिसत आहे. संगमा यांनी भाजपाला सूचक इशारा दिला आहे. NDAतून बाहेर पडण्याच्या योग्य वेळेची आम्ही वाटत पाहत आहोत, असं त्यांनी म्हटलं आहे.

याबाबत बोलताना संगमा म्हणाले, “जर केंद्र सरकारनं नागरिकत्व दुरुस्ती विधेयक राज्यसभेत आणलं तर आम्ही तात्काळ एनडीएतून बाहेर पडू.” दरम्यान नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून संगमा आणि मोदी सरकारमध्ये वाद आहे. संगमा यांनी पूर्वोत्तर राज्यांतील दुसऱ्या पक्षांनाही नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला विरोध करण्याचं अपिल केलं आहे. लोकसभेत मंजूर झालेले हे विधेयक राज्यसभेत प्रलंबित आहे. एनपीपीच्या पाठिंब्यावरच मणिपूर आणि अरुणाचलमध्ये भाजपाचं सरकार आहे. तर मेघालयमध्ये एनपीपीच्या सरकारला भाजपाचा पाठिंबा आहे.

याबाबत बोलताना संगमा म्हणाले की, “आम्ही दुसऱ्या पक्षांबरोबर मिळून नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला विरोध करू, कारण या विधेयकामुळे लोकसंख्या नियंत्रण कायद्यात मोठा बदल होणार आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक हे राज्यसभेत मंजूर होऊ नये, यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू.” याशिवाय आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे वेळ मागितला होता. परंतु पीएमओनं आम्हाला अजून वेळ दिलेली नाही, असंही संगमा यांनी स्पष्ट केलं आहे.

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकात असं प्रावधान आहे की, ज्याने पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून आलेल्या सहा अल्पसंख्याक समाजांच्या मुस्लिम लोकांना सर्व अडचणी संपवून भारतीय नागरिकत्व बहाल केलं जाणार आहे.