वीज ग्राहकांना लवकरच मिळणार खुशखबर ? वाढीव बिलातील 100 युनिट माफीचा सुरू आहे विचार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लॉकडाऊनमध्ये आलेल्या वाढीव वीजबिलामुळं सध्या अनेक ग्राहक त्रस्त आहेत. आता वीज ग्राहकांच्या 100 युनिटची जबाबदारी महावितरणावर टाकण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. याासाठीचा प्रस्ताव करण्याची सूचना ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी महवितरणाला दिली आहे. वीजबिल कमी करत अतिरीक्त खर्चाला फाटा देत तूट भरून काढावी असा आदेशही त्यांनी दिला आहे.

कोरोना काळातील टाळेबंदीनंतर काहींना दुपटीच्या दरानं वीजबिल आलं आहे. यामुळं अनेक वीजग्राहक संतप्त झाले होते. लॉकडाऊनमध्ये मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यात मीटर रिडींग झालं नाही. त्यामुळं डिसेंबर 2019 ते फेब्रुवारी 2020 या 3 महिन्यांची सरासरी काढून या आधारे जून महिन्यात बिलं पाठवण्यात आली आहेत.

अनेक असे ग्राहक आहेत जे जुलैत वाढीव बिल आल्यानं त्रस्त आहेत. तक्रार करणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. वाढी वीज बिलांवरून भाजपा आणि मनसे या पक्षांनीही सरकारला धारेवर धरलं. यामुळं डॉ. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक झाली. या बैठकीला महावितरण, महापारेषण आणि महाजनको अशा तीनही कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी डॉ राऊत यांनी वाढीव वीजबिलात किमान 100 युनिट माफ करण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्यासाठी सांगितलं.

जरी युनिट माफीचा प्रस्ताव तयार झाला तरीही वीज नियामक आयोगाच्या परवानगीशिवाय तो अंमलात आणणं शक्य नाही. आधी आयोगासमोर या प्रस्तावाची सुनावणी होईल. कायद्यानुसार संमतीशिवाय वीज दरात वाढ किंवा घट करण्याचा अधिकार महावितरणाला नाही.

अतिरीक्त खर्चाला कात्री मारून तोटा भरणार

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 100 युनिट माफ करणं, त्यापुढील 300 यिनिट पर्यंत 50 टक्के माफ करणं, 500 युनिटपर्यंत 25 टक्के माफ करणं अशा सूचनाही मंत्र्यांनी केल्या आहेत. वीजगळती आणि वीज चोरीचं प्रमाण कमी करून तसेच अतिरीक्त खर्चाला कात्री मारून या माफीमुळं होणारा तोटा भरून काढणं शक्य असल्याची चर्चा बैठकीत झाली.