गणपतीच्या पाटाखाली राज्यघटना ठेवल्यानं अभिनेते प्रविण तरडे ट्रोल ! नंतर डिलीट केली FB पोस्ट

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  आज जगभरात गणपती बाप्पांचं मोठ्या आनंदानं आणि भक्तीभावानं आगमन झालं आहे. यावेळी गणपतीची स्थापना करताना अनेकांनी वेगवेगळ्या कल्पना वापरल्या आहेत. मुळशी पॅटर्न फेम डायरेक्टर अभिनेते प्रविण तरडे यांनीही बाप्पांची स्थापना केली. परंतु यावेळी ते प्रचंड ट्रोल होताना दिसले.

प्रविण तरडे यांनी पुस्तकांचे मनोरे रचत गणपतीची प्रतिष्ठापना केली. तसं पाहिलं तर ही कल्पना चांगली होती. परंतु त्यांनी गणेश मुर्तींच्या पाटाखाली संविधानाची प्रत ठेवली. याचे फोटो समोर आल्यानंतर मात्र नवीन वाद समोर आला. त्यांनी केलेल्या पुस्तकांच्या मनोऱ्यावर संत तुकाराम, विठ्ठल, श्रीकृष्ण, ज्ञानेश्वर महाराज अशा मुर्त्या ठेवण्यात आल्या होत्या. संविधान मध्यभागी ठेवून मान देण्याची कल्पना कदाचित तरडेंच्या मनात असावी. पंरतु नेटकऱ्यांना मात्र हे खटकलं आहे.

तरडेंनी शेअर केलेले फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर एकच वाद सुरू झाला. अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. एका युजरनं लिहिलं की, केसांची वाढ झाल्यानं मेंदूची वाढ खुंटली असेल. गणपती बाप्पा त्यांना सद्बुद्धी देवो असंही तो युजर म्हणाला. देशाच्या संविधानाचा अपमान केलावरून प्रविण तरडे ट्रोल झाले आहेत. काही युजरनं असाही आरोप केला आहे की, प्रविण तरडेंनी जाणून बुजून हा खोडसाळपणा केला आहे. यामुळं कारवाईचीही मागणी केली जात आहे.

टीकेची झोड उठल्यानंतर प्रविण तरडे यांनी शेअर केलेली ही पोस्टच डिलीट केली. परंतु अनेकांनी आधीच या पोस्टचे स्क्रीनशॉट काढून सोशलवर संताप व्यक्त केला होता.