काम संपवुन निघालेल्या युवकास भरधाव कंटेनरनं चिरडलं, एकुलता एक असल्यानं आई-वडिलांवर आभाळ कोसळलं

भोकरदन : पोलीसनामा ऑनलाइन – (जि.जालना) भरधाव कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. शहरातील भोकरदन-जालना मुख्य रस्त्यावरील गिरणारे हॉस्पिटलसमोर मंगळवारी (दि.12) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान या अपघातात ठार झालेला तरुण हा आई वडिलांना नऊ वर्षांनंतर झालेला एकुलता एक मुलगा होता. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

शेख कलीम शेख रईस (वय 18 रा.उस्मानपेठ, भोकरदन) असे या अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील उस्मानपेठ भागातील रहिवाशी शेख कलीम हा तरुण काही कामानिमित्त शहरातील जालना रस्त्यावरील गिरणारे हॉस्पिटल परिसरात आला होता. येथील काम आटोपून तो दुपारी बाराच्या सुमारास दुचाकीने निघाला होता. त्यावेळी भोकरदनहुन जालन्याकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने जोराची धडक दिली. या धडकेनंतर कलीम हा कंटेनरच्या मागच्या चाकाखाली आल्याने त्याचा चिरडून जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर जवळपास अर्धा तास मृतदेह जागेवर पडून होता.

यादरम्यान दोन्हीकडील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. या घटनेचा पोलिसांकडून पंचनामा सुरू असून, मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती.