श्रद्धांजली सभेतील ‘त्या’ वक्तव्यामुळे तणाव

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘कॅन्डल मार्च’ व त्यानंतरच्या श्रद्धांजली सभेत विसापूरचा माजी सरपंच जब्बार सय्यद याने वादग्रस्त विधान केले. ”पाकिस्तानचे भारत काही बिघडवू शकत नाही”, असे वादग्रस्त विधान केल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त करीत कडकडीत बंद पाळला. सय्यद याच्याविरुद्ध संतापाची लाट उसळली. आज दुपारी सय्यद हा बेलवंडी पोलीस ठाण्यात स्वत:हून हजर झाला. त्याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाचे कलमे 153 ब अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

हेही वाचा – पाकिस्तान पंतप्रधानाची भारताला उघड धमकी

श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथे सोमवारी (दि. 18) संध्याकाळी पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कॅन्डल मार्च आणि सभेचे आयोजन करण्यात आले होते. याच सभेमध्ये बोलताना जब्बार सय्यद म्हणाला की, ‘भारत पाकिस्तानचं काही बिघडवू शकत नाही’.

जब्बार सय्यदच्या वादग्रस्त विधानाचा गावकऱ्यांकडून निषेध नोंदवण्यात येत आहे. गावात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आहे. जब्बार सय्यदच्या अटकेच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी आक्रमक होत आंदोलन छेडले आहे. सर्व व्यापा-यांनी तातडीने आपले व्यवसाय बंद केले. ग्रामस्थांच्या संतापाचा उद्रेक पाहून आज दुपारी सय्यद हा बेलवंडी पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याच्या अटकेची कारवाई केली जाईल, असे बेलवंडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पडवळ यांनी सांगितले.

समाजात द्वेषभावना पसरविण्याचे कृत्य केल्यास भारतीय दंड विधानाचे कलमे 153 ब या कलमान्वेय गुन्हा दाखल केला जातो. जब्बार सय्यद याने समाजात द्वेष भावना पसरवण्याचे कृत्य केल्याने त्यांच्याविरुद्ध बेलवंडी पोलीस ठाण्यात या कलमान्वये गुन्हा दाखल केला जाणार आहे.