घोडागाडीची शर्य़तीतील वाद बेतला तरुणाच्या जीवावर

गडहिंग्लज : पोलीसनामा ऑनलाईन – घोडागाडीची शर्य़तीतील वाद एका तरुणाच्या जीवावर बेतला आहे. घोडागाडी शर्यतीत गाडी लावण्यावरुन झालेल्या वादातून सतीश संजय बसर्गे (वय-१९) या तरुणाचा त्याच्याच मित्र मंजुनाथ लक्ष्मण फुटाणे (रा. हसूरचंपू, ता. गडहिंग्लज) याने धारदार शस्त्राने सपासप वार करुन खून केला. ही घटना सोमवारी (दि.४) रात्री घडली.

सतीश आणि मंजुनाथ हे दोघे जीवलग मित्र होते. दोघेही स्पर्धा, शर्यत पाहण्यासाठी एकत्र जात असत. शुक्रवारी हेब्बाळ येथे घोडागाडी शर्य़ती पाहण्यासाठी ते भडगाव येथे गेले होते. स्पर्धेत गाड्या लावण्यावरुन भडगावचे युवक व मंजुनाथ यांच्यात वाद झाले. तसेच त्यांच्यामध्ये किरकोळ धक्काबुक्की झीली होती. शनिवारी या वादातून गडहिंग्लज येथील संकेश्वर रोडवरील पेट्रोलपंपावर मंजूनाथ व भडगावचे युवक एकत्र येऊन भांडण मिटवत होते. त्याचवेळी सतीश त्या ठिकाणी आला. शुक्रवारी झालेला वाद मिटवल्याचे गावात समजणार म्हणून मंजुनाथने सतीशला शिवीगाळ केली. याच गोष्टीवरुन दोघांत दोन दिवसांपासून वाद सुरु होते.

सोमवारी रात्री आठच्या सुमारास सतीश दूध घालण्यासाठी आला असता त्यांच्यामध्ये पुन्हा वाद झाला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. यावेळी मंजूनाथने धारदार शस्त्राने सतीशच्या पोटावर सपासप वार केले. यामध्ये सतीशचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहीती सतीशचे चुलते रवींद्र बसर्गे यांनी गडहिंग्लज पोलिसांना दिली. सतीशच्या मागे आई, वडील व बहीण असा परिवार आहे. रात्री उशिरा शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास गडहिंग्लज पोलीस करीत आहेत.