कोरोनावरून चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला; म्हणाले – ‘शरद पवार, राज ठाकरेंसोबत चर्चा करा’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णसंख्येतही वाढ होत आहे. त्यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावर भाष्य केले. त्यामध्ये त्यांनी म्हटले, की ‘राज्यात अतिशय भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याअगोदर मुख्यमंत्र्यांनी कुठलाही अभिनिवेश न बाळगता ज्यांचे नाव आणि फोनला वजन आहे, त्यांच्याशी चर्चा करावी’.

पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील बोलत होते. ते म्हणाले, ‘उद्धवजींनी फक्त मुंबईत राहूनच नाही तर आपापल्या शहरात राहून निर्णय घ्यावे. त्यांनी सातत्याने रिसोर्स व्यक्तींच्या संपर्कात राहून ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हिरच्या उपलब्धतेसाठी प्रयत्न करायला हवेत. पुणे शहरात काल रात्री 10 रुग्णालयात ऑक्सिजन कमी पडला. ऐनवेळी महापौर आणि आयुक्तांनी धावपळ करून तो उपलब्ध करून दिला. आता परिस्थिती हाताबाहेर चालली आहे. उद्धवजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असून, ते जनतेचे पालक आहेत. त्यामुळे त्यांनी आता पावले उचलणे गरजेचे आहे’.

तसेच ज्यांच्या फोनला वजन आहे मग यात शरद पवार, नितीन गडकरी, राज ठाकरे, जयंत पाटील यांसारख्या व्यक्तींशी चर्चा करावी. त्यांच्यामार्फत नवनवीन पर्यायांद्वारे ऑक्सिजन, रेमडेसिव्हिर यांच्या उपलब्धतेवर भर द्यावा, असेही पाटील यांनी सांगितले.