Corona defeated : ‘हा’ काढा करतोय ‘कोरोना’वर मात, भोपाळमध्ये ज्या 90 जणांनी प्यायला त्यापैकी एकालाही नाही संसर्ग

भोपाळ : ज्या कोरोनावर ठोस उपाय अद्याप जगाने शोधलेला नाही, त्यावर भारतीय आयुर्वेदिक काढ्याने मात केल्याचा दावा केला जात आहे. ज्यांनी हा काढा प्यायला, त्यांना कोरोना व्हायरस आजारी करू शकला नाही. तसेच जे आजारी आहेत ते लवकर बरे होत आहेत. हा दावा मध्ये प्रदेशच्या आयुष विभागाने केला आहे.

आयुष विभागाकडून राज्यातील 24 जिल्ह्यातील 98 हॉस्पिटल आणि क्वारंटाइन सेंटरमध्ये हा काढा बाधितांच्या संपर्कात आलेल्या लोकांना आणि पॉझिटिव्ह रूग्णांना क्लिनिकल ट्रायल म्हणून दिला जात आहे. सात प्रकारच्या औषधांच्या मिश्रणातून हा काढा तयार केला जातो. तर एम्स भोपाळमध्ये सुद्धा रोग प्रतिकारकशक्ती वाढवण्याचे औषध मायकोबॅक्टीरियम डब्ल्यूची ट्रायल रूग्णांवर केली जात आहे. याचे सुद्धा चांगले परिणाम समोर येत आहेत.

काढा पिणार्‍या 90 जणांपैकी एकसुद्धा पॉझिटिव्ह नाही

भोपाळचे विभागीय आयुष अधिकारी डॉ. सुनील कुलश्रेष्ठ यांचे म्हणणे आहे की, या आयुर्वेदिक काढ्याने रोग प्रतिकारशक्ती वाढते. भोपाळच्या राजीव गांधी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या (आरजीपीव्ही) हॉस्टेलमध्ये मे महिन्यात 98 लोकांना क्वारंटाइन करण्यात आले होते. हे सर्व संक्रमित लोकांच्या थेट संपर्कात आले होते. कोरोनाची तपासणी केल्यानंतर त्यांच्यापैकी 8 जण बाधित आढळले होते. अन्य 90 लोकांना 13 मे रोजीपासून 22 मे पर्यंत आयुर्वेदिक काढा दिला गेला. ट्रायलमध्ये सहभागी आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. शशांक झा यांनी म्हटले, काढा पिणार्‍या 90 लोकांमध्ये एकही पॉझिटिव्ह आढळला नाही.

981 रूग्ण काढा प्यायल्यानंतर 952 बरे झाले

भोपाळच्या पं. खुशीलाल शर्मा सरकारी आयुर्वेद कॉलेजचे प्राचार्य डॉ. उमेश शुक्ला यांनी सांगितले की, आतापर्यंत क्वारंटाइन सेंटरमध्ये 970 लोकांना काढा दिला गेला. हे सर्व लोक थेट बाधित व्यक्तीच्या संपर्कात आले होते आणि हाय रिस्कमध्ये होते. कोरोनाच्या टेस्टमध्ये यापैकी 831 लोक बाधित होण्यापासून वाचले. अशाप्रकारे हॉस्पिटलमध्ये भरती 981 रूग्णांना हा काढा देण्यात आला. यापैकी 952 बरे झाले. अनेकजण असे आहेत जे पॉझिटिव्ह आढळल्यानंतर 10 दिवसाच्या आत निगेटिव्ह झाले.

मेडिकल कॉलेजचे डॉक्टर, नर्ससुद्धा पित आहेत

भोपाळच्या गांधी मेडिकल कॉलेजमधील कोरोना वॉर्ड, सॅम्पलिंग व कोरोना रूग्णांवर उपचार करणारे सर्व मिळून 200 आरोग्य कर्मचारी रोग प्रतिकारकशक्ती वाढवणारा काढा पित आहेत. त्यांनी आयुष विभागाला यासाठी लेखी संमती सुद्धा दिली आहे. हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ. एके श्रीवास्तव यांनी म्हटले, रोग प्रतिकारशक्ती चांगली राहावी म्हणून हे औषध पाजले जात आहे.

डॉ. उमेश शुक्ला यांनी सांगितले, ट्रायलसाठी राज्य सरकारकडून मंजूरी मिळाली आहे. क्लिनिकल ट्रायल रजिस्ट्री इंडिया (सीटीआरआय) मध्ये सुद्धा यासाठी नोंदणी करण्यात येईल. ट्रायल पूर्ण झाल्यानंतर पूर्ण अहवाल तयार केला जाईल. यानंतर परिणामांबाबत अंतिम काही सांगता येईल. सुरूवातीचे परिणाम खुप चांगले आहेत.

* या औषधांनी असा बनतो काढा

मरीच, पिपली, सुंठ, हरीतकी, गिलोय, कालमेघ आणि मुलेठी 200 ग्रॅम पाण्यात उकळवून सकाळ-संध्याकाळ 10 दिवसापर्यंत हा काढा घ्यावा.