Corona Impact : लग्नसराई, सण-वार, उत्सवावर ‘कोरोना’ची ‘गडद’ छाया, पुण्याचे विस्कटलेले अर्थकारण भाग – 4

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  (राजेंद्र पंढरपुरे) – यंदा पौरोहित्य करणारे पुरोहित, केटरर्स, फुलांची सजावट करणारे, मंडपवाले, सनई, वाजंत्री, बँडवाले हा सगळा वर्ग धार्मिक कार्ये बंद झाल्याने आर्थिक दृष्ट्या भरडला गेला आहे. यातील अनेकांची अक्षरशः उपासमार होत आहे.

कोरोना संसर्गाच्या भितीने घराघरातील धार्मिक कार्ये बंद झाल्याने पुरोहितांना कोणीही यजमान धार्मिक विधींसाठी आपल्याकडे बोलावत नाहीत. त्यामुळे पुरोहित वर्गाची प्रचंड आर्थिक ओढाताण चालू आहे. काही ब्रह्मवृंद मंडळांनी आणि दानशूर व्यक्तींनी धान्य, औषधे अशा स्वरुपात पुरोहितांना मदत केली आहे. पण, ती मदत पुरेशी नाही. पहिल्या महिन्या, दीड महिन्यानंतरच हा मदतीचा ओघ थंडावला आहे. लग्नसराईत दक्षिणेच्या निमित्ताने गुरुजींना, पुरोहितांना उत्पन्न मिळते. परंतु यंदा मंगलकार्यालयांचे बुकींगच रद्द करण्यात आल्याने लग्नविधी अगदी घरगुती स्वरुपात झाले. सत्यनारायणाच्या पूजा, वास्तूशांती, भूमिपूजन, व्रतवैकल्यांची सांगता आदी धार्मिक विधी फारशा प्रमाणात झालेले नाहीत. केवळ शास्त्र म्हणून काहींनी अगदी घरगुती स्वरुपात केले. आगामी काळात येणारे मंगलागौरीचे पूजन, श्रावणातील सत्यनारायण पूजा, श्रावणी सोमवार, शनी-मारुतीला अभिषेक, हरितालिका पूजन, गणपतीची प्राणप्रतिष्ठा, उत्तर पूजा, गौरी पूजन, नवरात्रातील घटस्थापना, खंडेनवमीचे यंत्रपूजन, वसूबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन असे धार्मिक कार्यांचे हे दिवस आहेत. परंतु, कोरोनाच्या भितीने ही कार्येही केवळ शास्त्र म्हणून केली जातील. यानिमित्ताने होणाऱ्या सजावटीचे साहित्य विक्री, तसेच पुजेचे साहित्य विक्री यावर परिणाम होईल. काही पुरोहितांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन पूजा, लग्नविधी केले. परंतु सरसकट सगळ्या गुरुजींना आणि यजमानांना इंटरनेटचा वापर जमणारा नाही/जमलेला नाही. आगामी काळ पौरोहित्य करणाऱ्या गुरुजींसाठी ओढाताणीचाच असेल. मंदिरेही कधी उघडतील त्याबाबत आजूनही प्रश्नचिन्ह आहे. धान्य आणि औषधे याची मदत मिळावी असे आवाहन काही गुरुजींनी सोशल मिडियावरुन केलेले होते. कधीही मदतीची याचना न करणारा हा वर्ग किती पिचलेला आहे याची त्यावरुन कल्पना येते. मंदिरे बंद असल्याने गुरव समाजालाही आर्थिक चणचण जाणवत आहे. पुरोहित आणि गुरव समाजासाठी काही संस्था मदत करीत आहेत. परंतु, ती मदत अगदी तोकडी आहे. त्यामुळे त्यांनाही अधिक मदतीची गरज आहे.

कार्य म्हणजे मंडप आलाच. मंडप व्यवसायात बांबू, दोरखंड, पडदे, पत्रे याचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्याने साहजिकच या वस्तूंची खरेदीही मोठ्या प्रमाणात होते. यंदा मंडपाचा व्यवसाय झालाच नाही. या व्यवसायावर मालक, ऑफिस स्टाफ, मांडव बांधणारे कामगार, त्यावर देखरेख करणारे मुकादम, मालाची ने-आण करणारे वाहन चालक हे सर्व अवलंबून असतात. यावेळी धंदाच न झाल्याने मालकांना पैसे मिळाले नाहीत त्यामुळे अन्य संबंधितांना पगार/रोजगार मिळाला नाही. यंदा गणपती आणि नवरात्र उत्सवही साधेपणानेच होणार आहेत त्यामुळे पुढील काळातही या व्यवसायात मोठे उत्पन्न मिळण्याची शक्यता नाही.

लग्न, मुंजी ही मंगल कार्य तसेच पूजा, अर्चा, होम, हवन या सगळ्याशी फुलं विक्रेते, फुलांची सजावट करणारे व्यावसायिक दृष्ट्या जोडलेले आसतात. यंदा मंगल कार्यालये तसेच मंदिरे बंद असल्याने फुलं विक्रेत्यांना त्याची चांगलीच झळ बसली आहे.

सनई, वाजंत्री, बँडवाले हे ही लग्न, मुंज, धार्मिक विधींशी जोडलेले असल्याने त्यांचेही उत्पन्न बुडाले. यंदा गणपती उत्सवात गणेशाच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुकांवर बंदी आल्याने तसेच नवरात्रातही मिरवणुकांवर बंदी आल्याने या वर्गाला आर्थिक ओढाताणीला सामोरे जावे लागणार आहे. या उत्सव काळात जे उत्पन्न मिळते ते वर्षभर उपयोगात येते. सध्या नेमके तेच उत्पन्न बुडत असल्याने आगामी काळात या सर्व घटकांना आर्थिक संकटाची दाहकता खूपच जाणवणार आहे.

पुण्यातल्या लग्नसराईतील खासियत म्हणजे दर्जेदार उत्कृष्ट जेवण. येथील चविष्ट जेवणासाठी पुण्यात लग्नकार्य करण्याकडे लोकांचा ओढा असतो. अलीकडे लॉन्स घेऊन लग्नसोहळे होतात. तिथे पारंपरिक जेवणाबरोबरच पंजाबी, चायनीज, काँटिनेंटल डिशेस असतात. हे पदार्थ बनविण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची ने-आण करण्यासाठी टेंम्पोची गरज असते. पदार्थ बनविण्यासाठी, त्यांचे वाढप करण्यासाठी आचारी, वाढपी आवश्यक असतात. जेवणानंतर मुखशुद्धी म्हणून विडा देण्याची पद्धत असते त्यासाठी विड्याची पाने, पानासाठीचे साहित्य गरजेचे असते, ते विडे बनवण्यासाठी माणसांची आवश्यकता असते. सध्या मंगल कार्यालये बंदच असल्याने जेवणावळींशी संबंधित या घटकांवरही आर्थिक संकट आले आहे. केटरिंगच्या व्यवसायाशी संबंधित मालक, आचारी, वाढपी अशी किमान पंधरा ते वीस हजार कुटुंब कार्यरत आहेत. कोरोना संकटामुळे ते सगळेच आर्थिक गर्तेत सापडले आहेत.