वॉर्डमध्ये ‘कोरोना’ग्रस्त नवरी, रुग्णच झाले वर्‍हाडी ! व्हिडिओ व्हायरल

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनामुळे अनेकांना अगदी साधेपणात लग्न उरकावे लागते आहे. त्यातही वधू किंवा वर पॉझिटिव्ह असतील मग काय हा सोहळा पुढे ढकलला जातो. मात्र केरळमधील एका कोरोनाग्रस्त तरुणीच्या बाबतीत वेगळेच घडले आहे. तिच्यावर कोव्हिड सेंटरमध्ये उपचार सुरू असतानाच तिचा निकाह करण्यात आला. त्यासाठी कोव्हिड सेंटरला रुग्णांनी अक्षरश: लग्नमंडपाचे रूप आणले होते.

केरळच्या एका कोव्हिड सेंटरचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एर्नाकुलममधील एका कोव्हिड केअर सेंटरमधील या व्हिडिओमध्ये अगदी जल्लोषात एका निकाह सोहळा होतो आहे. नवरीला कोरोना व्हायरसची लागण झाली होती. ती कोरोना पॉझिटिव्ह असली तरी कुटुंबाने तिचे ठरलेले लग्न पुढे न ढकलण्याचा निर्णय घेतला होता. लग्न म्हटले की नाचगाणे होणारच. पण कोव्हिड सेंटरमध्ये कुठे कोण नातेवाईक, मित्रमैत्रिणी, पाहुणे नाचायला येणार.

नवरीला वाटले आता आपल्याला आपल्या लग्नात असे काही पाहायला मिळणार नाही, असे तिला वाटले होते. मात्र, तिच्या लग्नात ती सजली नटली, नाचायला वर्‍हाडीदेखील आले आणि अगदी जल्लोषात तिचा निकाह सोहळा झाला. कोव्हिड सेंटरमध्ये तिच्यासह असलेले इतर कोरोना रुग्णच तिचे नातेवाईक, मित्रमैत्रिणी झाले आणि त्यांनी तिच्या निकाहात धम्माल केली. नवरीच्या भोवती फिरत, गाणं गात, नाचत त्यांनी तिचा उत्साह वाढवित फोटो काढले.