मुंबईतील क्वारंटाईन सेंटरमध्ये तरुणीशी अश्लील चाळे, पोलिसात FIR

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात मुंबईमध्ये कोरोना बाधित रुग्ण सर्वाधिक आढळून आले आहेत. मुंबईत कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मुंबईकरांची चिंता वाढली आहे. कोरोना बाधित रुग्णांना क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल करून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. मात्र, क्वारंटाईन सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या एका तरुणीसोबत छेडछड करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मलाड पश्चिममधील एका क्वारंटाईन सेंटरमध्ये हा प्रकार घडला असून याप्रकरणी चारकोप पोलीस ठाण्यात 20 जून रोजी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित व्यक्तीने स्वत:ला बीएमसीचा कर्मचारी असल्याचे सांगितले आहे.

पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार, मलाड पश्चिम येथील एका क्वारंटाईन सेंटरमध्ये मे महिन्यापासून एक कुटुंब क्वारंटाईन करण्यात आले आहे. 30 मे रोजी या कुटुंबातील सर्वच सदस्यांना घरी सोडण्यात आले. मात्र, 13 जून रोजी कल्पेश नावाच्या व्यक्तीने बीएमसी कर्मचारी असल्याचे सांगत, त्या कुटुंबातील तुरुणी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे फोन करून सांगितले. तसेच संबंधित तरुणीला क्वारंटाईन सेंटरमध्ये येण्यास सांगितले. त्यामुळे या तरुणीच्या वडीलांना तिला क्वारंटाईन सेंटरमध्ये आणून सोडले. त्यावेळी अमित तटकरे नावाच्या व्यक्तीने तिच्या रुमध्ये जाऊन ती कोरोना पॉझिटिव्ह नसल्याचे सांगितले आणि तिच्याशी अश्लील चाळे केले. तसेच उद्या सकाळी घरी सोडते असेही त्याने सांगितले.

दरम्यान, क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलांसोबत अश्लील चाळे करण्याच्या घटना वाढत आहेत. ही दुसरी घटना असून गेल्या महिन्यात उत्तराखंड येथे एका पोलीस शिपायानेच नवविवाहित महिलेवर अतिप्रसंग केला होता. उधमसिंग नगरच्या किच्छा विधानसभेच्या पुलभट्टा क्षेत्रातील क्वारंटाईन सेंटरमध्ये हा प्रकार घडला होता. याप्रकरणी पोलीस शिपायावर कारवाई करण्यात आली आहे.