इंग्लंडहून 300 प्रवासी पुण्यात दाखल, एक जण ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी होत असताना इंग्लंडमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आल्याने जगभरातील सर्वच देशांची चिंता वाढली आहे. इंग्लंडमध्ये नवा स्ट्रेन आढळून आल्याने अनेक देशांनी इंग्लडहून येणाऱ्या विमानांना बंदी घातली आहे. इंग्लंडवरून भारतात आलेल्या प्रवाशांची यादी प्रत्येक राज्यांना देण्यात आली आहे. महाराष्ट्रात देखील इंग्लंडवरुन आलेल्या प्रवाशांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. यामध्ये तीन प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून त्यापैकी एकजण पुण्यातील आहे.

इंग्लंडूमधून प्रवास करुन राज्यात आलेल्या तीन जाणांना कोरोनाच्या संसर्गाचे निदान झाले आहे. त्यात पुण्यासह मुंबई आणि नागपूर येथील प्रत्येकी एका प्रवाशाचा समावेश आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर असून, त्या कोरोनाच्या विषाणूचं स्ट्रेन इंग्लंडमध्ये उद्रेक झालेल्या विषाणूंशी मिळती-जुळतं आहे का, हे तपासण्यासाठी त्यांचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे (NIV) पाठवण्यात येणार आहेत.

कोरोना विषाणूंमध्ये जनुकीय बदल झाल्याचे इंग्लंडच्या प्रयोगशाळेत दिसून आले आहे. या बदलेल्या विषाणूचा संसर्ग वेगाने होत असल्याने, इंग्लंडमधून आलेल्या प्रवाशांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागातील राज्य सर्वेक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले की, इंग्लंडहून मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतलेल्या प्रवाशांची यादी विमानतळ आरोग्य अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे. ही यादी राज्यातील प्रत्येक जिल्हा आणि महापालिकेला पाठण्यात आली असून संबंधित प्रवाशांचा शोध घेऊन आरटीपीसीआर चाचणी करुन नमुने घेण्याची सूचना दिली आहे.

540 प्रवाशांची यादी पुणे महापालिकेकडे
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे सहायक आयुक्त डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले की, इंग्लंडमधून प्रवास करुन आलेल्या 540 प्रवाशांची यादी महापालिकेला मिळाली आहे. त्यापैकी 300 प्रवासी पुण्यातील आहेत. इतर प्रवासी हे पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागीतल आहेत. पुणे पालिकेच्या हद्दीतील 300 पैकी 295 प्रवाशांची यादी आरोग्य विभागाला मिळाली आहे. त्यापैकी 36 वर्षीय पुरुषाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. संसर्ग झालेला विषाणू नेमका कोणता, याचे जनुकीय विश्लेषण करण्यासाठी रुग्णाचे नमुने आज (शनिवार) एनआयव्हीकडे पाठवण्यात येणार आहेत.