Coronavirus : ‘कोरोना’संदर्भातील ‘या’ 5 बाबी सांगतात भारत लवकरच जिंकणार ‘महामारी’विरुद्धची लढाई

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : जगभर वेगाने पसरत असलेल्या कोरोना विषाणूने भारताला देखील आपल्या विळख्यात अडकवले आहे. भारतात कोरोना विषाणूची लागण आतापर्यंत 24 हजाराहून अधिक लोकांना झाली आहे, तर 775 लोकांचा मृत्यू झाला आहे. या सर्व प्रकारांमध्ये, लॉकडाऊन आणि केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे आता कोरोना विषाणूची गती हळू हळू कमी होत असल्याचे वृत्त आहे. वैज्ञानिकांनी असा दावा केला आहे की कोरोना विषाणूची आकडेवारी जरी आता वाढताना दिसत असेल परंतु मे पर्यंत त्याचा ग्राफ झपाट्याने खाली जाईल. एवढेच नव्हे, तर आता कोरोनाची चाचणी ज्या वेगाने लोकांमध्ये केली जात आहे, त्याने हे स्पष्ट झाले आहे की लवकरच कोरोनाची लढाई भारत जिंकेल. जाणून घेऊया असे 5 वृत्त ज्यामुळे दिलासा मिळेल.

1 : कोरोनाची चाचणी एकूण 5,41,789 लोकांवर करण्यात आली आहे

भारतासाठी सर्वात मोठी असणारी अडचण म्हणजे कोरोनाची लक्षणे ओळखू न येणे. असे म्हटले जाते की भारतात अशी अनेक प्रकरणे पाहिली गेली ज्यामध्ये रुग्णाला कोरोना विषाणूची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. अशा परिस्थितीत लोकांमध्ये कोरोना चाचणी घेणे बंधनकारक होते. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 23 एप्रिलपर्यंत 5,41,789 चाचण्या घेण्यात आल्या आहेत. 13 एप्रिल पर्यंत देशातील प्रत्येक 10 लाख लोकसंख्येवर 177 चाचण्या घेण्यात आल्या, परंतु आता त्या दुप्पट करण्यात आल्या आहेत. आता प्रत्येक 10 लाख लोकसंख्येवर 362 चाचण्या घेण्यात येत आहेत.

2 : दक्षिणी राज्यांमध्ये कोरोनावर प्रतिबंध

दक्षिणेकडील राज्यांमध्ये कोरोना विषाणूचा वेगवान प्रसार रोखण्यात आला आहे. महिन्याभरातील आकडेवारी पाहिल्यास कोरोनाची गती दक्षिणेकडे थांबली आहे. 24 मार्चपर्यंत तामिळनाडूमध्ये कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या 47.2 टक्क्यांनी वाढत होती, तर 23 एप्रिल ला त्यात घट होऊन ती 4.1 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. हीच परिस्थिती कर्नाटक आणि केरळमध्येही आहे.

3 : 78 जिल्ह्यात 14 दिवसांपासून नवीन प्रकरण नाही

भारतात कोरोना विषाणूचा परिणाम कमी होऊ लागला आहे. 14 दिवसांपासून देशातील 23 राज्यांमधील 78 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे कोणतेही नवीन प्रकरण समोर आले नसल्याचे सांगितले जात आहे. याबाबत माहिती देताना आरोग्य विभागाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले की, देशातील 12 जिल्ह्यांमध्ये गेल्या 28 दिवसांत कोरोना विषाणूची कोणतीही नवीन प्रकरणे समोर आली नाहीत. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेला हा डेटा देशाला दिलासा देणारा आहे.

4 : 11 राज्यांत संक्रमितांच्या संख्येत 50% घट

देशात कोरोना विषाणूची लागण कमी करण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा परिणाम अधिकाधिक प्रमाणात दिसून येत आहे. सोशल डिस्टेंसिंगमुळे जगातल्या इतर देशांच्या तुलनेने भारतात कोरोना विषाणूचा प्रसार कमी झाला आहे. 11 राज्यांत कोरोना संक्रमित रूग्णांच्या संख्येत 50 टक्क्यांपर्यंत घट झाल्याचे सांगण्यात येत आहे. गोवा, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर ही राज्ये तर कोरोनामुक्त झाली आहेत.

5 : कोरोना संसर्गाचा ग्राफ मे पासून होईल कमी

आरोग्य मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे की अधिक कोरोना चाचण्यांमुळे आता कोरोना संक्रमित रूग्णांच्या संख्येत वाढ दिसून येत आहे. ते म्हणाले की, पुढच्या महिन्यापासून कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये घट होईल. कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर व्ही के पॉल यांनी 30 एप्रिलनंतर कोरोना संक्रमित रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होण्याची आशा व्यक्त केली आहे.