कामगारांच्या पगारात कपात नको, व्यापारी अन् उच्च वर्गीयांना PM मोदींची भावनिक ‘साद’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित केले. या महासंकटाचा सामना करण्यासाठी देश सज्ज असून कोरोनाला टक्कर देणाऱ्या प्रत्येक भारतीयाचे मोदींनी आभार मानले. तसेच या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचेही सूचवले आहे. तर देशावरील हे संकट सर्वांनी एकत्र येऊन हाताळायचे असल्याचे मोदींनी म्हटल आहे.

देशासाठी आपले योगदान द्यावे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात सर्वसामान्य नागरिकापासून ते वैद्यकीय क्षेत्रात आणि कोरोनाशी दोन हात करण्याऱ्या प्रत्येक भारतीयाच्या कामगिरीला स्पर्श केला. तसेच आभारही मानले. यावेळी त्यांनी गरिब आणि मजदूर वर्गांच्या आर्थिक हितासाठी आवाहनही केले आहे. देशातील व्यावसायिक, व्यापारी, लहान-मोठे दुकानदार आणि लहानसहान संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या पगार कापू नका, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. माणूसकीच्या नात्यातून या गंभीर परिस्थितीचा सामना आपल्याला करायचा आहे. त्यामुळे कोरोनाच्या लढाईत देशासाठी आपलं योगदान द्यावे, असेही मोदींनी म्हटले आहे.

उच्चवर्गीय नागरिक आणि व्यापाऱ्यांना आवाहन
देशातील उच्चवर्गीय नागरिक आणि व्यापाऱ्यांना मोदींनी आवाहन केलं आहे. आपण, ज्या ज्या सर्वसामान्य नागरिकांकडून सेवा घेता त्यांना या संकटसमयी सुट्टी द्यावी. या काळात आपण सेवा खंडीत केली म्हणून या कामगारांच्या पगारीत कपात करू नका, असा माझा आग्रह असल्याचे मोदींनी म्हटले आहे. ज्याप्रमाणे तुम्हाला आणि मला घर चालवायचं आहे. तसेच सर्वसामान्यांनाही आपले घर चालवायचे असतं. त्यामुळे व्यापारी, उच्चवर्गीयांनी आणि लहान मोठ्या संस्थांनी कंपनीत काम करणाऱ्याच्या पगारात कपात करू नये, अशी भावनीक साद नरेंद्र मोदी यांनी घातली आहे.