पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आरोग्य अधिकारीपदी डॉ. नितीन बिलोलीकर यांची नियुक्ती, ‘कोरोना’ नियंत्रणात आणण्याचे ‘आव्हान’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  पुणे शहरातील कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आरोग्यविषयक उपाययोजनांबाबत महापालिकेला अतिरिक्त वैद्यकीय अधिकार्‍यांची गरज भासत आहे. या वाढत्या कोरोनाच्या संक्रमण काळात आरोग्यप्रमुख आजारी पडले आहेत, त्यामुळे पुण्यातील आरोग्य विभागाचे काम मंदावले आहे. त्यामुळे, महापालिकेने केलेल्या विनंतीनुसार, राज्य शासनाने जिल्हा शल्य चिकित्सक दर्जाच्या अधिकार्‍याची महापालिकेत बदली केली आहे. डॉ. नितीन बिलोलीकर असे त्यांचे नाव आहे.

शहरातील कोरोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या 44 हजारांच्या पुढे गेली आहे. तर, पुण्यात अ‍ॅॅक्टिव्ह रुग्ण 17 हजारांच्या घरात गेले आहेत. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचारी सलग चार महिन्यांपासून सलग काम करीत आहेत.

पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे आजरी आहेत. त्यामुळे हंकारे सध्या 10 दिवसांच्या रजेवर गेले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागातील काम मंदावले आहे. महापालिका प्रशासनाने राज्य शासनाकडे वैद्यकीय अधिकार्‍याची मागणी केली होती. त्यानुसार, राज्य शासनाने जिल्हा शल्य चिकित्सक दर्जाच्या अधिकार्‍याची महापालिकेत नियुक्ती केली आहे.

डॉ. नितीन बिलोलीकर असे त्यांचे नाव आहे. बिलोलीकर पदस्थापनेच्या प्रतीक्षेत होते. डॉ. नितीन बिलोलीकर यांनी याअगोदर विविध पदांवर काम केले आहे. राज्याच्या आरोग्य विभागात सहसंचालक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. त्यांना कोरोना संबंधित जबाबदारी दिली जाणार आहे, अशी शक्यता वर्तविली जात असून त्यांची महापालिकेला मदत होणार आहे. तसेच त्यांचे वेतन राज्य शासनाकडून दिले जाणार आहे, असे प्रशासनातील अधिकार्‍यांनी सांगितले.

वाढत्या कोरोनाबाधित रुग्ण संख्येच्या काळात महापालिकेच्या मदतीसाठी वैद्यकीय अधिकार्‍याची मागणी राज्य शासनाकडे केली होती. सध्या तब्येतीच्या कारणामुळे आरोग्यप्रमुखही रजेवर आहेत. कामाची गैरसोय टाळण्याकरिता तसेच मदतीकरिता महापालिकेला जिल्हा शल्य चिकित्सक दर्जाचे अधिकारी डॉ. नितीन बिलोलीकर यांना पाठविले आहे. त्यांची निश्चित मदत होणार असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांची नेमणूक केली आहे, असे पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी सांगितले आहे.

कोरोना नियंत्रणात आणण्याचे आव्हान

सध्या पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आरोग्य अधिकारीपदी डॉ. नितीन बिलोलीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, त्यांच्यापुढे आता पुण्यातील कोरोना नियंत्रणात आणण्याचे आव्हान असणार आहे. कोरोना विषाणूचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पुणे महापालिकेने वेळोवेळी लॉकडाऊन आणि अनलॉक अशी प्रक्रिया राबविली आहे. तरीही कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे. या कोरानाच्या साखळीला कसे तोडणार आणि कोरोना विषाणूचे वाढते संक्रमण कसे रोखणार आणि त्याला कसे नियंत्रणात आणणार? याचे आव्हान आता अतिरिक्त आरोग्य अधिकारीपदी डॉ. नितीन बिलोलीकर यांच्यापुढे असणार आहे.

पुणे महापालिकेने आपल्या हद्दीत कोव्हीड केअर सेंटरर्स उभारली आहेत. तसेच काही कंटेन्मेंट झोनदेखील आखले आहेत. याअगोदर महापालिकेने घरोघरो जाणून नागरिकांच्या आरोग्याची माहिती घेतली आहे. तसेच आवश्यक तेथे योग्य खबरदारी घेऊन महापालिकेने कंटेन्मेंट झोन आखले आहेत. तरीही कोरोनाचे संक्रमण होत आहे. त्यामुळे आता हेच वाढते संक्रमण रोखण्यासाठी पुणे महापालिका आणि आरोग्य विभाग काय यंत्रणा राबविणार? तसेच नागरिकांचे जनजीवन कसे सुरळीत आणणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.