Coronavirus : गोमुत्र आणि शेणानं खरंच कोरोनापासून बचाव होतो का ? जाणून घ्या तज्ञ काय सांगतात…

काही दिवसांपूर्वीच भाजपच्या आमदार सुमन हरिप्रिया यांनी असा दावा केला होता की, गोमुत्र आणि शेणाचा वापर करून कोरोना व्हायरसपासून बचाव केला जाऊ शकतो. यज्ञात तूप आणि गुळवेलासह या वस्तूंचा वापर करून आहुती दिली तर वातावरणातील कोरोना व्हायरस पूर्णपणे नष्ट केला जाऊ शकतो. या विधानावर तज्ज्ञांनी त्यांचं मत सांगितलं आहे. असं केल्यानं खरंच कोरोना नष्ट होऊ शकतो का यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

डॉ. राम आशिष यांनी एका मुलाखतीत बोलताना सांगितलं की, “कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतंही औषध उपलब्ध झालेलं नाही. अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळं लोकांपर्यंत चुकीचा संदेश जात आहे.”

पुढे बोलताना ते म्हणाले की, “वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशन कडून आरोग्य विषयक माहिती आणि सल्ले देण्यात आले आहेत. फक्त त्यावरच विश्वास ठेवायला हवा. या दाव्यांबद्दल कोणत्याही प्रकारचं शास्त्रीय कारण अद्याप मिळालेलं नाही.”

राम आशिष यांनी असंही सांगितलं की, “हा व्हायरस हवेतून पसरतो ही गोष्ट खरी आहे. कोरोना 1 मीटरपर्यंत हवेत पसरतो. काही वस्तू आणि सामानांवर कोरोना असेल तर तो अनेक तास जिवंत राहू शकतो. यासाठी मास्क वापरणं, सतत हात साबण किंवा सॅनिटायजरनं स्वच्छ करायला हवेत. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवण्याआधी जवळच्या आरोग्य केंद्रावर जाऊन डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.”