Coronavirus : लक्षणे नसलेल्या रूग्णांसाठी ‘सायलेंट किलर’ ठरू शकतो ‘कोरोना’ व्हायरस !

नवी दिल्ली : कोरोनाची लक्षणे नसलेले म्हणजेच असिम्प्टोमॅटिक रूग्णांबाबत असे समजले जाते की, त्यांना धोका कमी असतो. परंतु, नुकत्याच झालेल्या संशोधनातून असे पुढे आले आहे की, हा व्हायरस असिम्प्टोमॅटिक रूग्णांच्या शरीरात सायलेंट किलरप्रमाणे धोकादायक पद्धतीने हल्ला करत आहे. नेचर जर्नलमध्ये प्रकशित या संशोधनानुसार अशा रूग्णांची फुफ्फुसे कमजोर होत आहेत आणि त्यांच्यात निमोनियाचा धोका वाढत आहे.

शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की, प्रथमच असिम्प्टोमॅटिक रूग्णांच्या क्लिनिकल पॅटर्नमधून ही बाब समोर आली आहे. या रूग्णांच्या फुफ्फुसांचे नुकसान झाले तरी यांच्यात खोकला, श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे दिसली नाहीत. अशा रूग्णांना अचानक मृत्यूचा धोका जास्त आहे. मात्र, संशोधकांनी यामध्ये आणखी संशोधन करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.

मागील रिपोर्टमधून असे समोर आले की, भारतात सुमारे 80 टक्के असिम्प्टोमॅटिक रूग्ण आहेत. तर जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे की, जगात अशा रूग्णांची संख्या 6 ते 41 टक्केपर्यंत असू शकते. संशोधकांनी लक्षणे नसलेल्या 37 रूग्णांचा डाटा एकत्र करून अभ्यास केला, जो चीनच्या सेंटर फॉर डिसीज अ‍ॅण्ड प्रीव्हेशन संस्थेने एकत्र केला होता. या संस्थेने चीनमध्ये फेब्रुवारीपासून एप्रिलपर्यंत कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि तपासणीद्वारे एकुण 2088 रूग्णांचा शोध घेतला होता. रूग्णांच्या सिटी स्कॅनद्वारे समजले की, 57 टक्के रूग्णांच्या फुफ्फुसात काहीतरी इन्फेक्शन झाले आहे, जे सूज किंवा इन्फ्लेमेशनचे लक्षण आहे. ज्यामध्ये फुफ्फुसे आपल्या नैसर्गिक क्षमतेने काम करणे बंद करतात.