पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी 3 पोलीस ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील आणखी तीन पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आयुक्तालयातील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या 13 वर गेली आहे. यातील 8 पोलीस कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 5 जणांवर शहरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सरु आहेत.

पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना बाधित पोलिसांची संख्या 13 झाली असून यातील 8 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. डिस्चार्ज देण्यात आलेले पोलीस कर्मचारी कर्तव्यावर हजर झाले आहेत. गुरुवारी एका पोलिसाचा तर शुक्रवारी सकाळी दोन पोलिसांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शुक्रवारी पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे. त्यांच्या कुटुंबियांना क्वारंटाईन केले असून पोलिसांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये नागरिकांच्या सुरिततेसाठी कर्तव्यावर हजर असलेल्या पोलिसांनाही मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, मागील दोन दिवसांमध्ये तीन पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याने पिंपरी-चिंचवड पोलीस दलात चिंतेचे वातावरण पसरले आहे.