Corona Vaccine : पहिल्या 3 कोटी लोकांच्या लसीकरणाचा खर्च केंद्र सरकार करणार : PM मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना लसीकरण (Corona Vaccine) मोहिमेला दि.16 जानेवारीपासून प्रारंभ होणार असल्याचे केंद्र सरकारने (Central government) जाहीर केले आहे. तसेच पहिल्या 3 कोटी लोकांसाठी राबवल्या जाणाऱ्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा खर्च केंद्र सरकार करणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद मोदी यांनी दिली आहे.

देशातील कोरोना साथीची स्थिती, मोहिमेची पूर्वतयारी अशा सर्व गोष्टींचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी एका उच्चस्तरीय बैठकीत घेतला. कोविशिल्ड, कोवॅक्सिन या लसींच्या आपत्कालीन वापराला औषध महानियंत्रकांनी मंजुरी दिल्यानंतर काही दिवसांतच मोहीम सुरू करण्याचा विचार केंद्राने प्रत्यक्षात आणला आहे. दरम्यान लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. आपल्याला लोकांना जागरूक करत राहावेच लागणार आहे. हेच काम कोरोना लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसनंतरही करावे लागणार आहे. या लसीकरणावर वैज्ञानिकांच्या सल्ल्यानुसार काम करत राहणार असून त्याच दिशेने पुढे जात आहोत असे मोदी यावेळी म्हणाले.