दिलासादायक ! महाराष्ट्रातील पहिले ‘कोरोना’ग्रस्त दांपत्य कोरोना’मुक्त’ (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन – पुणेकरांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील पहिले कोरोनाग्रस्त दांपत्य कोरोनामुक्त झाले आहे. आज त्यांची पुन्हा एकदा चाचणी केली जाईल. चाचणीचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास त्यांना डॉ. नायडू हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देखील देण्यात येईल. अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

9 मार्चला पुण्यात राज्यातील पहला कोरोनाचा रूग्ण आढळून आला होता. परदेश दौरा करून आलेल्या दांपत्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर रूग्णांचा आकडा वाढत गेला. हे दांपत्य गेल्या 14 दिवसांपासून डॉ. नायडू रूग्णालयात उपचार घेत होते.

महापौर मोहोळ यांनी व्हिडीओच्या माध्यमातून या संदर्भात माहिती देताना सांगितले की, तब्बल 14 दिवसानंतर दांपत्याची चाचणी करण्यात आली. मला हे सांगताना अत्यंत समाधान तसेच आनंद होत आहे की, या तपासणीत त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. 24 तासानंतर आज पुन्हा एकदा त्यांची चाचणी करण्यात येणार आहे. या चाचणीचे रिपोर्ट जर निगेटिव्ह आले तर त्यांचा रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. यातून जनमानसात एक चांगला संदेश गेला आहे की, कोरोना आजार बरा होऊ शकतो. मी रूग्णालयाचे डॉक्टर, नर्स तसेच कर्मचार्‍यांचे आभार मानतो तसेच त्यांच्या सेवेप्रति कृतज्ञता देखील व्यक्त करतो.