कोरोना संकट ! तब्बल 19 % नोकरदारांनी काढली PF मधील रक्कम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मागील पाच महिन्यांच्या कालावधीत पीएफ कार्यालयाकडे नोंदणीकृत असलेल्या सुमारे ५ कोटी ८१ लाख नोकरदारांपैकी सुमारे १ कोटी १२ लाख म्हणजे सुमारे १९ टक्के नोकरदारांनी भविष्यासाठी राखून ठेवलेली जवळपास २० हजार कोटींची रक्कम काढून घेतली आहे. टाळेबंदी काळात नोकरदारांवर आलेलं आर्थिक संकट कमी करण्यासाठी भविष्य निर्वाह निधीतील काही रक्कम काढण्याकरता केंद्र सरकारने परवानगी दिली आहे.

केंद्र सरकारने भविष्य निधी योजनेचे सदस्य असलेल्या नोंदणीकृत कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचे मूळ वेतन महागाई भत्त्याच्या एकत्रित रकमेच्या ७५ टक्के रक्कम अर्थात दीड महिन्याच्या वेतनाएवढी रक्कम खात्यामधून काढण्याची मुभा दिली आहे. गेल्या दोन महिन्यांत दररोज एक लाखांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कोविड आणि नॉन कोविड अशा दोन्ही श्रेणीतील क्लेम अदा करण्यात येत आहेत.

नोंदणीकृत असलेल्या नोकरदारांना पूर्वीपासून घरबांधणी, घर दुरुस्ती, मुलांचे शिक्षण, औषधउपचार आदी सहा ते सात कारणांसाठी पैसे काढण्याची मुभा आधीपासून होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक संकट आलेले नोकरदार या दोन्ही पर्यायाचा वापर करुन निवृत्तीनंतरची तजवीज म्हणून ठेवण्यात आलेली रक्कम काढून घेत आहेत. एप्रिल आणि मे महिन्यात सरासरी १५ लाख ८२ हजार नोकरदारांनी या दोन्ही पर्यायांचा वापर करुन रक्कम काढली आहे. मागील दोन महिन्यांपासून हे प्रमाण २६ लाख ७१ हजारांवर पोहचलं आहे. अर्थात दररोज जवळपास १ लाख नोकरदार आपली भविष्य निर्वाह निधी रक्कम काढू लागले आहेत.

वेतन झाले कमी

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या टाळेबंदी मुळे अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आली असून काही जणांचे वेतन कमी झाले आहेत. तर काही जणांना काम केल्यानंतरही वेतन दिले जात नाही. म्हणून दिवसागणिक या क्लेमची संख्या वाढत असल्याची माहिती या विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.