Coronavirus : देशातील ‘कोरोना’चे तब्बल 21 % अ‍ॅक्टीव्ह रूग्ण महाराष्ट्रात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या देशात काेराेनाचे 4 लाख 9 हजार 689 सक्रिय रुग्ण आहेत, शनिवारी या संख्येत 6 हजार 393 ने घट दिसून आली. जागतिक स्तराच्या तुलनेत सक्रिय रुग्णांचे प्रमाण देशात 2.17 टक्के आहे. देशपातळीचा विचार केल्यास महाराष्ट्रात सर्वाधिक 84 हजार 938 सक्रिय रुग्ण असून हे प्रमाण 21 टक्के आहे. केरळ राज्यात हे प्रमाण 15 टक्के असून ही संख्या 61 हजार 535 आहे.

दिल्लीत पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असतानाही तेथील सक्रिय रुग्णसंख्येचे प्रमाण 7 टक्के म्हणजे येथे 28 हजार 272 सक्रिय रुग्ण आहेत. सर्वाधिक दैनंदिन रुग्णवाढ पाच राज्यांमध्ये दिसून येत असून यात महाराष्ट्र, केरळ, दिल्ली, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशचा समावेश आहे.

सर्वाधिक पॉझिटिव्हीटी प्रमाण महाराष्ट्र (16.55) गोवा (13.61) चंडीगढ (11.96 टक्के), नागालँड (9.9 टक्के) आणि केरळ (9.63 टक्के) असल्याची नोंद आहे. देशात उपचार सुरू असलेल्या कोविड रुग्णांचे प्रमाण शुक्रवारच्या बाधित रुग्णांच्या 4.44 वरून 4.35 टक्क्यांपर्यंत घसरले आहे. गेल्या 24 तासांत नवीन बाधितांपेक्षा बरे झालेल्यांची दैनंदिन संख्या अधिक नोंदवण्यात आली आहे.

दिवसभरात 5,834 रुग्ण कोरोनामुक्त
राज्यात शनिवारी 5834 रुग्ण बरे झाले. आतापर्यंत 17 लाख 15 हजार 884 रुग्ण कोरोनामुक्त झाले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.88 टक्क्यांवर असून मृत्युदर 2.58 आहे. सध्या 82,849 सक्रिय रुग्ण आहेत. दिवसभरात 4922 रुग्णांचे निदान झाले असून, 95 मृत्यू झाले. परिणामी, बाधितांची एकूण संख्या 18 लाख 47 हजार 509 झाली असून मृतांचा आकडा 47 हजार 694 आहे.