Coronavirus : पिंपरी चिंचवड शहरात ‘कोरोना’चे 228 नवीन रुग्ण, 16 जणांचा मृत्यू

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   मागील काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरात कोरोना बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण घटले आहे. शहरात नवीन रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण घटले असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने ही दिलासादायक बाब मानली जात आहे. आज दिवसभरात शहरामध्ये 228 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत तर 16 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 85 हजार 323 वर पोहचली आहे. आज 355 रुग्णांची दुसऱ्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 81 हजार 107 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरात रुग्णांची संख्या घटत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी झाले आहे.

गेल्या 24 तासामध्ये शहरात कोरोनामुळे 16 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 7 रुग्ण हे पालिका हद्दीबाहेरील आहेत तर 9 रुग्ण हे शहरातील आहेत. आज मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये पिंपरी, चिंचवड, वाकड, पिंपळे सौदागर, संत तुकारामनगर, भोसरी, काळेवाडी, किवळे, निगडी, शिरुर, जुन्नर, खेड, आळंदी, मुळशी येथील रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत शहरात 2076 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून यामध्ये 1473 शहरातील तर 603 पालिका हद्दी बाहेरील आहेत. सध्या शहरामध्ये 2010 सक्रीय रुग्ण असून त्यांच्यावर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत.