Coronavirus Impact : सर्व निवडणुका 3 महिन्यांनी पुढं ढकलल्या, सरकारचे अत्यंत महत्वाचे ‘हे’ निर्णय, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात उच्छाद मांडलेल्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारदेखील आवश्यक खबरदारी आणि महत्वाची पावलं उचलत आहे. कोरोनाच्या पार्श्ववभूमीवर ग्रामपंचायत व नगरपालिकेच्या आगामी निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. तसेच गर्दी टाळण्यासाठी काटेकोर प्रयत्न करण्यात यावेत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले. तसेच राज्यातील ग्रामीण भागातील सर्व शाळाही बंद करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील वर्षा निवासस्थानी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत यासंदर्भात माहिती दिली.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने उचललेल्या पावलांमुळे अद्याप राज्यात परिस्थिती नियंत्रणात आहे. नियम सर्वांना सारखे असून धार्मिक सण-उत्सव, समारंभांसोबतच राजकीय कार्यक्रमांनाही परवानगी देऊ नका, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. सार्वजनिक स्वच्छतागृह या ठिकाणी सॅनिटायजर, साबण आणि पाणी उपलब्ध राहील यांची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. परदेशातील टुर्सना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, एखादी व्यक्ती कोरोनाग्रस्त असली तरी ती काही गुन्हेगार म्हणून न टाळता तिला योग्य औषधोपचार आणि मानसिक आधारही द्या. जे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले त्यांच्यासाठी मानसिक आधार देण्याची आवश्यकता असून ज्या नागरिकांना होम क्वॉरंटाईन सांगितले आहे त्यांनी स्वत:हूनच घरी राहून स्वत:बरोबरच इतरांचीही काळजी घ्यावी. तसेच कोरोनाच्या आपत्कालीन उपाययोजनांसाठी तातडीचा निधीचा पहिला हप्ता म्हणून ४५ कोटी रुपये विभागीय आयुक्तांना देण्यात येणार आहेत.

राज्य सरकारने घेतलेले महत्वाचे निर्णय :
१) राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या.

२) उद्यापासून मंत्रालयात अभ्यांगतांना प्रवेश न देण्याचा निर्णय.

३) नागरिकांनी शासकीय कार्यालयात गर्दी न करता ई-मेलच्या माध्यमातून तक्रारी, अर्ज पाठवावेत. त्यावर जिल्हा प्रशासनाने सात दिवसात कार्यवाही करावी.

४) क्वॉरंटाईन सुविधा असलेल्या ठिकाणी दूरचित्रवाणी, कॅरमबोर्ड, जेवण आदी सुविधा देण्यात याव्यात.

५) ग्रामीण भागातीलही शाळा बंद ठेवणार.

६) केंद्र शासनाने ज्या सात देशांचा प्रवास करुन आलेल्यांना सक्तीचे क्वॉरंटाईन करण्याच्या सूचना केल्या आहे, त्यामध्ये राज्य शासनाकडून दुबई, सौदी अरेबिया आणि अमेरिका यांचाही समावेश करण्यात आला.

७) कोरोनाच्या उपाययोजनांसाठी तातडीच्या निधीसाठी कोकण आणि पुणे विभागीय आयुक्तांना प्रत्येकी १५ आणि १० कोटी तर, नागपूर, अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक विभागीय आयुक्तांना प्रत्येक ५ कोटी रुपये असे ४५ कोटींचा पहिला हप्ता देणार

८) ज्यांना १०० टक्के घरी क्वॉरंटाईनच्या सूचना आहे, त्यांच्या डाव्या हातावर शिक्का मारावा. जेणेकरुन समाजात या व्यक्ती वावरताना आढळल्यास त्याची ओळख पटेल. तसेच या व्यक्तींची विचारपूस करण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी.

९) धर्मगुरु, लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेऊन व्यापक जनहितासाठी कायद्याचा प्रभावी वापर करावा.

१०) आवश्यकता भासल्यास व्हेंटिलेटर आणि अन्य उपकरणे स्थानिक बाजारातून विकत घेण्याचे जिल्हा प्रशासनाला अधिकार.