Coronavirus Impact : ‘कोरोना’मुळं आगामी गुरूवारपासून 31 मार्चपर्यंत सर्व शूटिंग ‘कॅन्सल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यामध्ये कोरानाचे रुग्ण आढळून आल्यानंतर राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालय, मॉल, चित्रपटगृह, जलतरण तलाव 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कोरोनाचा फटका अनेक उद्योग धंद्यांना बसला असताना आता कोरोनाचा फटका चित्रीकरणाला देखील बसला आहे. कोरोनामुळे येत्या गुरुवार पासून 31 मार्चपर्यंत सर्व चित्रीकरण रद्द करण्याचाचित्रीकरण रद्द निर्णय घेण्यात आला आहे.

रविवारी मुंबईत फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज, इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशन, इंडियन फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशनच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यामुळे दररोज कोट्यावधी रुपयाचे नुकसान निर्मात्याला सहन करावे लागणार आहे. या क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्या अनेक कामगारांना अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. या निर्णयामुळे सिनेमा, छोटा पडदा, वेबसिरीज, जाहिराती या सर्व मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घटकांचे संपूर्ण चित्रीकरण रद्द करण्यात आले आहे.

भारतात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. याच पार्शभूमीवर सिनेक्षेत्राशी संबंधित असणाऱ्या सर्व संघटनांनी एकत्र येऊन खबरदारी म्हणून चित्रीकरण रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सिनेमांचे, मालिकांचे दिवस रात्र सुरु असणारे चित्रीकरण आणि या चित्रीकरणात दररोज एका ठिकाणी अनेक लोक एकत्र काम करत असतात. या गर्दीच्या ठिकाणी कोरोनाचा प्रसार झटपट होऊ शकतो. त्यामुळे यावर नियंत्रण रहावे यासाठी आम्ही एकत्र येऊन हा निर्णय घेतला असल्याचे निर्मात्यांनी सांगितले.

चित्रीकरण बंद करण्याच्या निर्णयाचा परिणाम मराठी सिनेमा आणि डेलीसोप यांच्या चित्रीकरणावर होणार आहे. येत्या दोन दिवसांत आधी ठरविल्याप्रमाणे राहिलेले शुटिंग पूर्ण करून गुरुवार पासून 31 मार्चपर्यंत संपूर्ण चित्रीकरण बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे गोरेगाव चित्रनगरी, मढ, ठाणे, मिरारोड या भागातील स्टुडिओ, बंगले यामधील चित्रीकरण ठप्प होणार आहे.