ब्रेकिंग – भारतातील आणखी एका राज्यात ‘कोरोना’ची ‘एन्ट्री’, अमृतसरमध्ये दोघांचा रिपोर्ट +ve

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसने जगभरात उच्छाद मांडला आहे. भारतातही या व्हायरसने प्रवेश केला असून ३३ रुग्ण आढळले आहे. त्यात आता आणखी भर पडली असून पंजाबच्या अमृतसरमध्येही कोरोनाव्हायरसचे दोन रुग्ण आढळले आहेत. या दोघांची चाचणी सकारात्मक आढळली आहे. वैद्यकीय अधीक्षक रमण शर्मा यांच्या म्हणण्यानुसार हे दोघे ३ तारखेला दिल्लीतून विमानाने आले होते. त्यांना विमानतळावरून थेट अमृतसरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हॉस्पिटलमधून मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघेही होशियारपूर येथील रहिवासी आहेत. ते इटलीमधून भारतात पोहोचले होते. त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी दिल्लीच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असल्याची माहिती रुग्णालयाने दिली. त्यांचा रिपोर्ट सकारात्मक आला आहे. आता त्यांचे नमुने पुण्यात पाठविण्यात आले असून आज त्यांचा अहवाल येऊ शकेल.

दरम्यान, जगभरात आतापर्यंत १ लाख लोकांना संसर्ग झाला असून मृतांचा आकडा ३४०० वर पोहोचला आहे. त्यात एकट्या चीनमध्ये अजून नव्याने १४३ रुग्ण आढळले असून ३० जणांचा मृत्यू झाला आहे. यासह मृतांची संख्या ३०४२ वर पोहचली आहे. चीनमध्ये संसर्ग बाधित रुग्णांची संख्या ८०,५५२ वर गेली आहे.