Coronavirus : रॅपिड टेस्ट किटच्या तक्रारीवर चीननं दिलं स्पष्टीकरण – ‘प्रकरण गंभीर, करणार भारताची मदत’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना रॅपिड टेस्ट किटबाबत उपस्थित प्रश्नांचे स्पष्टीकरण चीनने दिले असून भारतातील चीनी दूतावास प्रवक्त्याने बुधवारी सांगितले की, चीन निर्यात केलेल्या वैद्यकीय उत्पादनांच्या गुणवत्तेला मोठे महत्त्व देते. आम्ही संबंधित भारतीय एजन्सीशी संपर्क साधत आहोत आणि आवश्यक ती मदत केली जाईल.

खरतर केंद्र सरकारने देशभरात दोन दिवस रॅपिड टेस्ट किट चाचणीवर बंदी घातली आहे. राजस्थान सरकारच्या रॅपिड टेस्टच्या निकालावर गंभीर प्रश्न उपस्थित झाल्यावर बंदी घातली गेली आहे. आता केंद्रीय टीम्स या चाचणीच्या निकालांचे गांभीर्याने परीक्षण करतील, त्यानंतरच पुढील पाऊल जाहीर केले जाईल.

काय आहे प्रकरण?
केंद्र सरकारला रॅपिड टेस्टवर दोन दिवसांचा ब्रेक लावावा लागला, कारण राजस्थान सरकारने त्यावर प्रश्न उपस्थित केले. जयपूरच्या सवाई मानसिंग हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या १६८ कोरोना रुग्णांची रॅपिड टेस्ट घेण्यात आली होती, परंतु केवळ ५ टक्के रुग्णच तपासणीत पॉजिटीव्ह आढळले. यानंतर गहलोत सरकारने राज्यात होणाऱ्या रॅपिड टेस्टवर बंदी घातली.

दोन दिवसांची बंदी
१३३ कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात कोरोना तपासणीसाठी रॅपिड टेस्टला गेम चेंजर मानले जात होते, पण या चाचणीच्या निकालावर प्रश्नचिन्ह उठल्यानंतर आरोग्य मंत्रालयाने आणि आयसीएमआरने दोन दिवस रॅपिड टेस्टवर बंदी घातली आहे. या दोन दिवसांत केंद्राची तज्ञ पथके रॅपिड टेस्ट किटची तपासणी करतील.

कोणाकडे किती किटस?
आतापर्यंत देशातील सर्व राज्यात लाखो रॅपिड टेस्ट किट वितरित केल्या गेल्या असून दिल्लीला ४२,००० किट दिल्या गेल्या आहेत. राजस्थानमध्येही १० हजार किट पोहोचली आहेत. उत्तर प्रदेशात ८५०० तर पंजाब आणि गुजरातमध्ये अनुक्रमे १० हजार १०० आणि २४ हजार किट पाठवण्यात आल्या आहेत.