Coronavirus : ‘कोरोना’ची लस चोरण्याचा चीनचा प्रयत्न ? अमेरिकेवर मोठा ‘सायबर’ हल्ला

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतेही औषध उपलब्ध झाले नसून प्रत्येक देश लस तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहे. चीनने हेतूपुरस्सर कोरोना व्हायरसची माहिती जगापासून लपवून ठेवल्याने जगभरात कोरोना पसरला आणि आर्थिक नुकसानीबरोबर लाखो जीव गेल्याचा आरोप अमेरिकेने चीनवर केला होता. चीन व्हायरस संबोधल्याने दोन देशांमध्ये वाक् युद्धही रंगले होते. आता या युद्धाने सायबर हल्ल्यापर्यंत मजल मारली असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे.

अमेरिकेतील ट्रम प्रशासनाने चीनवर हा आरोप लगावला आहे. चीनला अमेरिकेने कोरोनाबाबत केलेलं संशोधन आणि त्यावर शोधल्या जाणाऱ्या औषधांची माहिती हवी आहे. त्यामुळे त्यांनी ही माहिती मिळविण्यासाठी सायबर हल्ला केला आहे. अमेरिकेच्या एजन्सी आणि मेडिकल संस्थेवर सायबर हल्ले वाढू लागले आहेत. त्यामुळे हॉस्पिटल, रिसर्च लॅब, हेल्थ केअर प्रोव्हायडर आणि फार्मासिटीकल कंपन्यांवर याचा मोठा परिणाम होत असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

एका वृत्तसंस्थेला माहिती देताना अधिकाऱ्याने सांगितले की, डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड ह्यूमन सर्व्हिसेजव दररोज सायबर हल्ले होऊ लागले आहेत. जगात दोन जागा अशा आहेत की या डिपार्टमेंटवर अशा प्रकारचे हल्ले करू शकतात. त्यापैकी चीनवर आमचा संशय असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दुसरा देश रशिया असे या अधिकाऱ्याने अप्रत्यक्षपणे सांगितले.

डिपार्टमेंट ऑफ जस्टिसनुसार चीनी हॅकरांना अमेरिकेच्या हॉस्पिटल आणि लॅबवर हल्ला करायचा आहे. याची चिंता प्रशासनाला आहे. जॉन डेमर या अधिकाऱ्याने सांगितले की, सध्या कोरोना व्हायरसच्या लसीवर बायोमेडिकल संशोधन सुरु आहे. जो देश कोरोनावर लस शोधून काढेल त्याची इतिहासात मोठी नोंद होणार आहे. त्यामुळे चीन यासाठी प्रयत्नशील असण्याची शक्यता आहे. त्या देशाच्या यशाचे गुणगान जगभर गायले जाणार आहे, असे डेमर यांनी सांगितले.