‘कोरोना’चा सामना करणार्‍या अशोक चव्हाणांनी हॉस्पीटलमधून केलं ‘हे’ आवाहन (व्हिडीओ)

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन –  लॉकडाऊनच्या मुद्यावर काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस सरचिटनीस प्रियंका गांधी आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी मोदी सरकार वर ट्रिपल अॅटॅक केला. काँग्रेसच्या या तीनही नेत्यांनी केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात सोशल मीडियावर पक्षाच्या ‘स्पीक अप इंडिया’ अभियानाला सुरुवात केली आहे. या अभियानामध्ये कोरोनाशी लढत असताना देखील महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी सहभाग नोंदवला आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान मंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाली आहे. अशोक चव्हाण यांच्यावर मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रुग्णालयातूनच त्यांनी काँग्रेसच्या स्पीक अप इंडिया या मोहिमेत सहभाग घेतला आहे. त्यांनी हॉस्पिटलमधून एक व्हिडिओ जारी करून आपण देखील काँग्रेसच्या या मोहिमेत सहभागी होत असल्याचे सांगितले.

अशोक चव्हाण यांनी जारी केलेल्या व्हिडिओत म्हटले आहे की, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी-वढेरा यांनी स्पीक अप इंडिया ही मोहीम हाती घेतली आहे. लाखो देशवासियांच्या भावना बुलंद करण्यासाठी मी सुद्धा मुंबईत एका रुग्णालयातून या मोहिमेत सहभागी होत आहे. कोरोनाशी लढत असतानाही मी या मोहिमेत सहभागी होत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. ते पुढे म्हणाले, लॉकडाऊनमुळे सर्वात जास्त फटका सामान्य लोकांना, शेतकऱ्यांना, शेतमजूरांना आणि गरीबातील गरीब लोकांना बसला आहे. छोट्या व मध्यम उद्योगांना फटका बसला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी काँग्रेस पक्षाने सूचना केल्या आहेत.