Coronavirus : PM मोदींनी नागरिकांना केलं ‘अनोखं’ आवाहन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशाला संबोधित करताना नागरिकांनी गरजेशिवाय बाहेर पडू नका, असे सांगत आवश्यक सेवा देणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडावेच लागेल, याची जाणीव त्यांनी करून दिली. पण अशाच अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मोदींनी एक अनोखे आवाहन नागरिकांना केले आहे.

मागील दोन महिन्यांपासून लाखो जण रुग्णालय, कार्यालय, रस्त्यावरील गल्ल्यांत आपलं काम चोखपणे बजावत आहेत. त्यामध्ये डॉक्टर, नर्स, रुग्णालयाचे कर्मचारी, एअरलाईन्सचे कर्मचारी, सरकारी कर्मचारी, पोलीस कर्मचारी, मीडिया कर्मचारी, रेल्वे, बस, ऑटो सुविधा पुरवणारे, होम डिलिव्हरी करणाऱ्यांचा समावेश आहे. हे लोक कोरोना संक्रमणाचा धोका पत्कारत दुसऱ्यांना सेवा पुरवत आहेत. आपलं कर्तव्य निभावत आहेत, असे म्हणत मोदींनी नागरिकांना या प्रत्येकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी दिली.

कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 22 मार्च (रविवार) रोजी आपण अशाच लोकांना धन्यवाद अर्पण करू. रविवारी अर्थात जनता कर्फ्युच्या दिवशी सायंकाळी 5 वाजता आपण आपल्या घरांच्या दरवाजात, खिडक्यांत, बाल्कनीमध्ये उभं राहून 5 मिनिटं अशा व्यक्तींचे आभार मानू. हे आभार प्रदर्शन व्यक्त करण्यासाठी तुम्ही टाळ्या वाजवून, थाळ्या वाजवून, घंटी वाजवून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करू शकता, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. तसेच स्थानिक प्रशासनाला आग्रह देखील केला आहे. 22 मार्च रोजी 5 वाजता सायरन वाजवून याची सूचना लोकांपर्यंत पोहचवावी.