‘हॅन्डवॉश’ आणि ‘सोशन डिस्टेन्सिंग’पेक्षा देखील जास्त ‘ही’ गोष्ट तुम्हाला वाचवू शकते ‘कोरोना’पासून, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  अमेरिकेत केलेल्या एका अभ्यासानुसार, हँडवॉश आणि सोशल डिस्टन्सिंगपेक्षा फेस मास्क माणसांना कोरोना विषाणूपासून वाचवण्यात अधिक प्रभावी ठरत आहे. हा अभ्यास थियोडोर रुझवेल्ट या अमेरिकन युद्धनौकेवर करण्यात आला. या युद्धनौकावर सुमारे एक हजार लोकांना कोरोनाची लागण झाली होती.

मार्चमध्येच थियोडोर रुझवेल्ट युद्धनौकाच्या ४९०० क्रू सदस्यांपैकी १००० हून अधिक लोक कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. त्यात एका व्यक्तीचा मृत्यूही झाला होता. युद्धनौकाच्या कॅप्टनला पदावरून हटवण्यात आले होते. नंतर नौदल आणि यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोलने युद्धनौकाच्या ३८२ क्रू मेंबर्सचे नमुने घेऊन अभ्यास केला.

युद्धनौकावरील कोरोनाची प्रकरणे कशी वाढली आणि इतर लोक कसे बचावले, हे अधिकाऱ्यांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला. एका वृत्तसंस्थेनुसार, अधिकाऱ्यांना असे आढळले की मास्क घालणारे लोक आणि न घालणाऱ्या लोकांमध्ये कोरोना संक्रमण होण्याचा २५ टक्के फरक आहे.

सोशल डिस्टंसिंगचे पालन करणारे आणि न करणारे यांच्यात कोरोनाचा संसर्ग होण्यात १५ टक्के फरक होता. कोरोना संसर्ग होण्याबाबत हात धुणाऱ्या आणि न धुणाऱ्यांमध्ये केवळ ३ टक्के फरक होता.

कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क किती फायदेशीर आहे याबद्दल महिन्याभरापासून तज्ञांमध्ये चर्चा चालू होती. बऱ्याच तज्ज्ञांनी असे सांगितले होते की, मास्कपासून कोरोना टाळण्याचे काही थोडे पुरावे आहेत.

बर्‍याच देशांमध्ये कोरोनापासून बचावासाठी सर्व लोकांना मास्क घालायचा सल्ला दिला गेला. आता बर्‍याच देशांमध्ये मास्क घालणे बंधनकारक आहे. थिओडोर रुझवेल्ट युद्धनौकेवर केलेल्या अभ्यासात असेही आढळून आले की, ज्यांनी बचावाची साधने वापरली त्यांना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याचे प्रमाण कमी होते.

३८२ लोकांच्या नमुन्यावर केलेल्या अभ्यासात असे दिसून आले होते की, मास्क घातलेल्या ५५ टक्के लोकांना संसर्ग झाला आहे. तर न घातलेल्या लोकांमध्ये संक्रमित होणाऱ्यांची संख्या ८० टक्के होती. म्हणजेच मास्क घातल्याने संक्रमण रोखण्यात २५ टक्के घट झाली.