Coronavirus : हवेलीत आजची ‘उच्चांकी’ कोरोना रुग्ण संख्या

थेऊर : पोलीसनामा ऑनलाइन –   हवेली तालुक्यात आज तब्बल 245 नवीन रुग्णांची नोंद झाली असून ही आजपर्यंतची उच्चांकी कोरोना रुग्ण संख्या आहे.कोरोनाचा हवेली तालुक्यातील संसर्ग झपाट्याने वाढत असून नागरिकांना मात्र याचे गांभीर्य लक्षात येतच नसल्याचे चित्र अनुभवास येत आहे.

पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डाॅ सचिन खरात यांनी दिलेल्या माहितीनुसार आज हवेलीची उच्चांकी रुग्ण संख्या नोंदवली आहे. तर कोरोनावर मात करुन घरी परतल्यांची संख्या 175 इतकी आहे. या आजाराने गेल्या चोवीस तासात सात जण मृत्यू पावले आहेत. दिवसागणिक मृत्यू दर वाढत असून आज तो 2.09 टक्के इतका आहे त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आजही अनेकजण लक्षणे लपवत असल्याने रुग्ण शोधणे अवघड होत आहे. आजच्या आकडेवारी नुसार नांदेड 43, वाघोली 37, उरुळी कांचन 20, लोणी काळभोर 10, कदमवाकवस्ती 09, आळंदी म्हातोबा 09 या गावांची वाढती रुग्ण संख्या भयावह आहे.

सामाजिक अंतर व मास्क वापर याची सक्ती केली जात असली तरीही नागरिकामध्ये स्वयंस्फुर्तीने याची सवय लागे पर्यंत दंडात्मक कारवाई करुनही काही उपयोग होताना दिसत नाही. स्वतःची काळजी घेतल्याशिवाय यावर आवर घालणे अवघड होणार आहे.