Coronavirus : … तर ‘कोरोना’वर लवकरच औषध मिळणार, भारतीय औषध कंपनीचा ‘दावा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतात देखील कोरोना व्हायरसने शिरकाव केला आहे. कोरोना व्हायरसमुळे जगभरात 11 हजार पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतेही औषध उपलब्ध नाही. भारत, अमेरिका, चीन या देशांकडून कोरोनावर औषध शोधण्याचे प्रयत्न केले जात आहेत. अशातच खोकला, सर्दी अशा अनेक आजारांवर औषध बनवणाऱ्या भारतीय कंपनीने पुढील सहा महिन्यात कोरोनावर औषध आणण्याचा दावा केला आहे.
सिप्ला या औषध कंपनीने पुढील सहा महिन्यात कोरोनावर औषध आणण्याचा दावा केला आहे.

या कंपनीचा दावा खरा ठरला तर कोरोनावर औषध शोधणारी ही पहिली भारतीय कंपनी असेल. ही कंपनी सरकारी प्रयोगशाळांच्या सहाय्याने कोरोनावर औषध शोधण्याचे संशोधन करत आहे. या आजारात श्वास घेण्यास त्रास, दमा, अँटी व्हायरल तसेच एचआयव्हीची औषधांचा वापर करून कोरोनावर औषध शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून सध्या भारतात 285 रुग्ण आढळून आले आहेत.

कोविड 19 चा इलाज नाही पण…
सिप्लाचे प्रमोटर युसूफ हमिद यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की, आम्ही सर्वोतोपरी संशोधन देशाच्या फायद्यासाठी करणं हे आमचं राष्ट्रीय कर्तव्य मानतो. सिप्लाने स्विझरलँड येथील रोचेज एक्टेमरा औषध भारतात पहिलं वितरीत केलं आहे. त्याचा वापर फुफ्फुसाच्या रोगासाठी केला जातो. जर भारतीय वैद्यकीय क्षेत्राने निर्णय घेतला तर कंपनीकडे अधिक औषधे आहेत, त्याचा वापर केला जाऊ शकतो. कोविड -19 चा इलाज नाही. पण एचआयव्ही, अँटी व्हायरल आणि मलेरियाविरोधी औषधांचा वापर कोरोनाविरोधात केला जाऊ शकतो.

औषध मिळण्यास 6 महिने लागणार
कोरोनाच्या विषाणूच्या उपचारासाठी फेविपीरावीर, रेमिडेसिव्हिर आणि बोलेक्सावीर सारख्या अँटी व्हायरलचं उत्पादन सुरु केलं आहे. सरकारी प्रोयोगशाळांसह या तीन औषधांसाठी कच्चा माल कसा बनवायचा याचा आम्ही विचार करत आहोत. कच्चा माल तयार केल्यावर औषध मिळण्यास सहा महिने लागतील असं हमीद यांनी सांगितले.

सध्याच्या औषधांचा चांगला परिणाम
आमच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक प्रकारची औषधे आहेत, परंतु कोणतं मिश्रण यावर काम करू शकेल हे सांगता येत नसल्याचे हमीद यांनी सांगितले. कोरोनावर उपचारासाठी सध्या ज्या औषधांचा वापर होत आहे त्याचे चांगले परिणाम दिसत आहेत. त्यांची चाचणी घेण्यात येत आहे त्यात अँटी व्हायरल ड्रग रिमिडेसिव्हिर, दोन एचआयव्ही औषधे लोपिनवीर आणि रीटोनाविर आणि मलेरिया विरोधी औषध क्लोरोक्विन यांचा समावेश आहे, असी माहिती हमीद यांनी दिली.