धक्कादायक ! दिल्लीत ऑक्सिजनअभावी 25 रुग्णांचा तडफडून मृत्यू, आणखी 60 रुग्णांचा जीव धोक्यात

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाने धूमाकुळ घातला आहे. दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे. रुग्णालयात ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेडचा तुटवडा निर्माण झाल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. दरम्यान राजधानी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात ऑक्सिजनअभावी गेल्या 24 तासात 25 रुग्णाचा तडफडून मृत्यू झाला आहे. दरम्यान ऑक्सिजन वेळेत न मिळाल्यास गंभीर अवस्थेत असलेल्या 60 रुग्णांचा जीव धोक्यात असल्याचे रुग्णालय प्रशासनाने म्हटले आहे.

 

रुग्णालयाच्या संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात आता फक्त 2 तास पुरेल एवढाच ऑक्सिजन साठा उपलब्ध असल्याचा तातडीचा संदेश प्रशासनाला पाठविला आहे. व्हेन्टिलेटर आणि बायलेव्हल पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर योग्य पद्धतीने काम करत नाही. रुग्णालयात आयसीयू आणि ईडीमध्ये मॅन्युअल पद्धतीने व्हेन्टिलेशन सुरू आहे. त्वरीत पुरवठा होण्यासाठी हवाई मार्गाने ऑक्सिजन पोहचविण्याची गरज आहे. रुग्णालयातील आणखी 60 रुग्णांचा जीव धोक्यात आहे. वेळेवर ऑक्सिजन मिळाला नाही, तर या रुग्णांनाही वाचवण्यात यश येणार नसल्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.