Coronavirus : देशात ‘करोना’चा कहर ! सलग दुसऱ्या दिवशी नव्या रुग्णांची संख्या दीड लाखांच्या पुढे

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस भयावह होत चालला आहे. देशात लसीकरण मोहीम सुरु असताना देखील कोरोना बाधितांच्या संख्येत वेगाने वाढ होत असल्याने प्रशासनाची चिंता अधिक वाढली आहे. देशात सलग दुसऱ्या दिवशी दीड लाखांच्यावर कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे. देशात महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वाधिक झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी सरकारच्या नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

सोमवारी (दि.12) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार 11 एप्रील रोजीच्या 24 तासांत देशात जवळपास 1 लाख 69 हजार रुग्ण आढळून आले आहेत. हा आजपर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. या गतीने जर रुग्णांची संख्या वाढत राहिली तर देशात येत्या काही दिवसात दोन लाखांच्यावर रुग्ण आढळून येतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात 24 तासात तब्बल 904 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. रुग्ण वाढत असताना मृतांचा आकडा वाढत असल्याने चिंता अधिक वाढली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतात गेल्या 24 तासात 1 लाख 69 हजार 914 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर याच 24 तासांत तब्बल 904 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 35 लाख 25 हजार 379 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत देशात एकूण 1 लाख 70 हजार 209 नागरिकांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत.

देशात आढळून आलेल्या रुग्णसंख्येमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक 63 हजार 294 रुग्ण आढळून आले आहेत. त्यानंतर उत्तर प्रेदश -15 हजार 276, दिल्ली- 10 हजार 774, छत्तीसगड- 10 हजार 521, कर्नाटक- 10 हजार 255 या राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक आढळून आले आहेत. देशात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 5 लाखांच्या पुढे आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण पुण्यात आहेत.