‘कोरोना’चा कहर सुरूच, कामगार मंत्रालयात 11 अधिकारी बाधित, निवडणूक आयोगातही रूग्ण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हायरसचे संकट सतत वाढतच चालले आहे. मागील काही दिवसांपासून दहा हजार नवीन प्रकरणे समोर आली आहेत. सोमवारी केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयात कोरोना व्हायरसची प्रकरणे समोर आली. कामगार शक्ती भवनमधील मंत्रालयात 11 अधिकारी कोरोना व्हायरस पॉझिटीव्ह आढळले आहेत.

दिल्लीत आतापर्यंत अनेक केंद्रीय मंत्रालयाच्या अधिकार्‍यांना कोरोना महामारीचा संसर्ग झाला आहे. आरोग्य मंत्रालय, संरक्षण मंत्रालय, माहिती व प्रसारण मंत्रालय आदीमध्ये कोरोना बाधित सापडले आहेत. काही दिवसांपूर्वीच दिल्ली मेट्रो, दिल्लीचे उपराज्यपाल यांच्या कार्यालयातील काही अधिकारी सुद्धा कोरोना बाधित आढळले आहेत.

कामगार मंत्रालयासह निवडणूक आयोगातही कोरोना व्हायरसचे प्रकरण समोर आले आहे. येथे ईव्हीएम डिव्हिजनमध्ये काम करणारा अधिकारी कोरोना पॉझिटीव्ह आढळला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सरकारी कार्यालयांमध्ये अधिकार्‍यांसाठी येण्या-जाण्यासाठी काही नियम जारी करण्यात आले आहेत. ज्यामध्ये मास्क घालणे, डिस्टन्सिंगचे पालन, एकत्र न येणे, मीटींगमध्ये अंतर ठेवणे असे नियम आहेत.

देशातील कोरोना व्हायरसच्या प्रकोपाचा विचार करता मागील 24 तासात सुमारे 10 हजार नवी प्रकरणे समोर आली आहेत. आता देशात एकुण प्रकरणांची संख्या अडीच लाखाच्या पुढे गेली आहे.

आरोग्य मंत्रालयानुसार…

देशातील एकुण प्रकरणे : 256611

अ‍ॅक्टिव्ह प्रकरणे : 125381

आतापर्यंत बरे झाले : 124094

एकुण मृत्यू : 7135

देशात मागील काही दिवसात कोरोना व्हायरसच्या प्रकरणांचा वेग वाढला आहे. यादरम्यान देशात अनलॉक वनच्या दुसर्‍या फेजला सुरूवात झाली आहे. आता देशात धार्मिक स्थळे, मॉल, हॉटेल आणि रेस्टॉरंट उघडली आहेत. मात्र काही राज्यांनी अजूनही प्रतिबंध कायम ठेवला आहे. तसेच काही ठिकाणी यासाठी कडक नियम बनवण्यात आले आहेत.