‘मी देशासाठी मरतो, पण आजारी पत्नीला कुठे घेऊन जाऊ’, हतबल BSF जवानाचा अश्रूंचा बांध फुटला

रीवा/ मध्य प्रदेश : वृत्तसंस्था –   देशात कोरोनाचा व्हायरसचा विस्फोट झाला असून दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. देशातील अनेक राज्यामध्ये कोरोनाची स्थिती गंभीर होत चालली आहे. अनेक ठिकाणी रुग्णांना बेड मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची धावाधाव होत आहे. अशीच एक घटना मध्य प्रदेशात घडली आहे. सीमेवर देशवासियांसाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या जवानाला आपल्या पत्नीला वाचवण्यासाठी लाचार झाल्याचे पाहून अनेकांना धक्का बसला. शत्रुला तोडीसतोड प्रत्युत्तर देणारा हा जवान आपल्या कुटुंबाचं संरक्षण करण्यासाठी हतबल झाल्यानंतर अश्रू भरलेल्या डोळ्यांनी रुग्णालयात बेड मिळवण्यासाठी धडपड करत होता.

बेडसाठी जवानाची आठ तासांची भटकंती

पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यासाठी आठ तासापासून एका हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये फिरत आहे. रुग्णालयात पत्नीसाठी बेडची चौकशी करण्यासाठी गेल्यानंतर दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये पाठवल जात आहे. मात्र, पत्नीला कोणत्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करता येईल हे कोणीच निश्चित पणे सांगत नाही. असे या जवानाचे म्हणणे आहे. तसेच त्याने मदतीसाठी आवाहन केले. त्यानंतर पत्रकारांच्या मदतीने जवानांने आपल्या आजारी पत्नीला रीवाच्या संजय गांधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

‘मी देशासाठी मरतो पण…’

देशाच्या रक्षणासाठी पहाडाप्रमाणे उभा राहणाऱ्या या जवानाला आपण आपल्या कुटुंबासाठी काहीच करु शकत नसल्याचे लक्षात आल्यानंतर स्वत:च्या परिस्थितीवर बोलताना हा जवान हळवा झाला. मी देशासाठी मरतो. पण आजारी पत्नीला घेऊन मला फिरावं लागत आहे. कुठे आणि कसे उपचार करु ? अशी हतबलता जवानाने प्रसार माध्यमांसमोर व्यक्त केली.

हा बीएसएफ जवान त्रिपुरामध्ये तैनात आहे. चार दिवसांपूर्वी सुट्टी घेऊन तो आपल्या घरी आला आहे. जवानाने कोरोनाची लस घेतली आहे. मात्र घरी आल्यानंतर पत्नी आजारी असल्याचं त्याला समजलं. चाचणी केल्यानंतर पत्नी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. मंगळवारी सकाळपासूनच पत्नीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी जवान रुग्णालयाच्या फेऱ्या मारत होता. मात्र, आठ तास त्याला कोणत्याही रुग्णालयात मदत उपलब्ध झाली नाही.