मराठवाडयातील ‘या’ महिला सरपंचानं ठेवला महाराष्ट्रासमोर आदर्श, ठेवलं गावाला कोरोनापासून दूर

लातूर :  पोलीसनामा ऑनलाइन  –  एकीकडे राज्यात कोरोना संसर्गाचा प्रसार वाढत असताना लातूर जिल्ह्यामधील एका महिला सरपंचानं सतर्कता दाखवतं आपल्या गावाला कोरोना संसर्गापासून मुक्त ठेवत नवा आदर्श सर्वासमोर ठेवला आहे. लातुरातील कोराळी येथील महिला सरपंचामुळे गावावरती आलेलं मोठं संकट टळल्यानं गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

निलंगा तालुक्यातील कोराळी हे गाव आहे. येथील एक कुटुंब काही वर्षांपासून मुंबईत स्थायिक झालेलं होत. त्यांच्यातील एका नातेवाईकांचा ८ दिवसांपूर्वी कोरोना संसर्गामुळं मृत्यू झालेला. मात्र, ही माहिती या कुटुंबीयांनी लपवून ठेवली होती. तरी सुद्धा ही माहिती ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका आणि सरपंचांना मिळाली. दरम्यान, हे कुटुंब मुंबईहून परवानगी न घेता शनिवारी गावात येऊन लपून बसले होते.

लगोलग महिला सरपंचांनी आपल्याबरोबर काही सदस्यांना घेत या घराला टाळे ठोकले. तसेच या कुटुंबातील ६ जणांची रवानगी रुग्णलयात करण्यात आली. तेथे त्यांची कोविड-१९ चाचणी केली असता कुटुंबातील सर्व ६ जणांना कोरोना संसर्गाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. घराबाहेर टाळं लावल्यानं हे कुटुंब गावातील कोणाच्याही संपर्कात येऊ शकले नाही. त्यामुळे गावात कोरोना संसर्गाचा होणार प्रसार रोखल्यामुळे मोठं संकट टळलं. महिला सरपंचानी वेळीच सतर्कता दाखवली नसती तर कोरोनाचा संसर्ग गावात पसरण्याची भीती होती. या घटनेनंतर संपूर्ण गावात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, गावाला सील करण्यात आलं आहे.