Coronavirus in Pune : पुण्यात कोरोनाचा कहर ! गेल्या 24 तासात 4400 पेक्षा जास्त नवे पॉझिटिव्ह तर 35 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव संपुर्ण देशात वाढत आहे. राज्यातील कोरोनाची परिस्थिती देखील अतिशय चिंताजनक आहे. पुणे शहरात गेल्या 24 तासात कोरोनाचे तब्बल 4 हजार 426 नवे पॉझिटिव्ह आढळून आल्याने चिंता आणखी वाढली आहे. दरम्यान, दिवसभरात पुणे शहरात 35 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुण्याचे 28 तर बाहेरील 7 रूग्णांचा समावेश आहे.

दिवसभरात 2 हजार 107 रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात कोरोनाचे 33 हजार 123 अ‍ॅक्टीव्ह रूग्ण आहेत. आतापर्यंत कोरोनामुळं पुणे शहरातील 5 हजार 219 जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाख 59 हजार 112 वर जाऊन पोहचला आहे. त्यामध्ये समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 2 लाख 20 हजार 770 रूग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज दिवसभरात 16 हजार 804 जणांचे स्वॅब घेण्यात आले. त्यापैकी 4 हजार 426 जणांचा कोरोनाचा अहवाल सकारात्मक आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क परिधान करावं तसेच सोशल डिस्टेन्सिंगच्या नियमांचं पालन करावं असं आवाहन प्रशासनाकडून वेळावेळी करण्यात आलं आहे.