Coronavirus in Pune : पुण्यात ‘कोरोना’चा धोका वाढला ! गेल्या 24 तासात 1350 पेक्षा जास्त नवे पॉझिटिव्ह

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झपाटयाने वाढत आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरात गेल्या महिन्याभरातील सर्वाधिक म्हणजेच तब्बल 1352 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दिवसभरात शहरातील 7 जणांचा मृत्यू झाला आहे तर पुण्याबाहेरील 6 जणांचा कोरोनामुळं पुणे शहरात मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस कोरोनाचं संकट वाढत असल्याचं समोर आलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

दिवसभरात 646 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात 364 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पुणे शहरातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या तब्बल 2 लाख 11 हजार 521 वर जाऊन पोहचली आहे. त्यामध्ये सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 1 लाख 98 हजार 892 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत पुणे शहरात कोरोनामुळं तब्बल 4 हजार 910 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पुणे शहरातील कोरोनाच्या सक्रिय रूग्णांची संख्या 7 हजार 719 आहे. नागरिकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्कचा वापर करावा तसेच सोशल डिस्टेन्सिंगचे नियम पाळावेत असे आवाहन प्रशासनाकडून वेळावेळी करण्यात आले आहेत.