Coronavirus : ‘कोरोनाबाबत मुंबई, पुण्याकडून शिकावं’, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून कौतुक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असताना ‘मुंबई मॉडेल’चे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कौतुक केले आहे. यापूर्वी सुप्रीम कोर्टाने आणि निती आयोगाने कौतुक केले होते. कोरोना व्यवस्थापनाच्या ‘मुंबई मॉडेल’ची सध्या देशभरात चर्चा सुरु आहे. कोरोना रुग्णांच्या हॉस्पिटल व्यवस्थापनाबाबत केंद्र सरकारने देखील ‘मुंबई मॉडेल’चे कौतुक केले आहे. यासोबत लॉकडाऊनचा फायदा पुण्याचे उदाहरण केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी दिलं.

राज्यात प्रमुख शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढले. मुंबईत हॉस्पिटलमध्ये रुग्णांना दाखल करुन घेण्यासाठी चांगली व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईत 24 वॉर्डसाठी 24 कंट्रोल रुम तयार करण्यात आल्या आहेत. कोरोना चाचणीचे जेवढे रिपोर्ट येतात ते मुख्य कंट्रोल रुममध्ये वॉर्ड प्रमाणे विभागणी केली जाते. त्यानंतर वॉर्डमध्ये बनवलेल्या कंट्रोल रुमध्ये ते पाठवण्यात येतात. वॉर्डमध्ये बनवण्यात आलेल्या कंट्रोल रुममध्ये डॉक्टरसह वैद्यकीय कर्मचारी आणि रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आली आहे. वॉर्डात एकादा व्यक्ती पॉझिटिव्हि आढळून आला तर त्याला रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे का, याचा आढावा घेतला जातो. ज्या रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे त्यांना तातडीने रुग्णवाहिका पाठवून रुग्णालयात दाखल केले जाते. यासाठी 800 एसयूव्ही गाड्यांना मेकशिफ्ट अॅब्युलन्स बनवण्यात आले आहे. बेड्सची माहिती मिळण्यासाठी एक सेंट्रलाइज डॅशबोर्ड तयार करण्यात आला आहे. अशी माहिती लव अग्रवाल यांनी दिली.

पुण्याचा पॉझिटिव्हीचा दर 23 टक्क्यांपर्यंत खाली आला

लॉकडाऊनचा फायदा कसा घ्यावा हे पुण्याकडून शिकवं असे अग्रवाल यांनी म्हटले. कंटेन्मेंट झोनमध्ये निर्बंधांचे काटेकोर पालन केल्याने त्याचा हमखास फायदा होतो. पुण्यामध्ये मार्च महिन्यात पॉझिटिव्हिटी दर हा 69.7 टक्के होता. यानंतर तिथे रात्रीची संचारबंदी लागू केली. 29 मार्च ते 12 एप्रिल ही संचारबंदी लागू करण्यात आली. याचा परिणाम असा झाला की रुग्ण संख्या कमी झाली. यानंतर पुन्हा संचारबंदीत 15 दिवसांची वाढ करण्यात आली. लॉकडाऊन सुरु होण्यापूर्वी पुण्यातील पॉझिटिव्हिटीचा दर 41 टक्क्यांपर्यंत होता. आता तो 23 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे, असे अग्रवाल म्हणाले.