दिलासादायक ! ‘लॉकडाऊन’मध्ये सरकारकडून आणखी काही व्यवहारांना ‘सूट’, भर उन्हाळ्यात ‘ही’ राहणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन घोषीत करण्यात आले आहे. या लॉकडाऊमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व अस्थापने बंद आहेत. कोरोना व्हायरसच्या या लॉकडाऊनमध्ये सरकारने आणखी काही व्यवहारांना सूट दिली आहे. सर्व प्रथम म्हणजे ज्या घरात ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या बँकेतील खात्याचं काम करणारे आणि देखभालीसाठी आवश्यक असलेल्या सेवांना सरकारने सूट दिली आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सहसचिव पुण्य सलिला श्रीवस्ताव यांनी दिली. डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना आवश्यक ती सुरक्षा पुरवावी, अस पत्रही गृहमंत्रालयाने 22 एप्रिलला राज्यांना पाठवलं आहे.


‘ही’ दुकाने सुरु होणार
सरकारने शहरी भागातील अन्न प्रक्रिया उद्योग जसे दूध डेअरी, ब्रेडचे कारखाने (बेकरी), पीठाच्या गिरण्या सुरु करण्यास परवानगी दिली आहे. मोबाइल प्रीपेड रिचार्ज करण्यासाठी रिचार्जची दुकानंही सुरु राहतील. उन्हाळ्याचे दिवस असल्याने पंख्यांची दुकानं सुरु ठेवण्यासही सरकारने मुभा दिली आहे. तसंच विद्यार्थ्यांसाठी पुस्तकं आवश्यक असल्याने पुस्तकांची दुकानंही सुरु राहतील, असे गृहमंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.


केंद्र सरकारने या संदर्भात राज्यांना 21 एप्रिल रोजी पत्र पाठवलं आहे. याशिवाय फळांची आयात-निर्यात, कृषी आणि फळबागा उत्पादन करणाऱ्या संशोधन संस्थांना, मधमाशी पालन आणि त्यासंबंधिच्या व्यवहारांना सूट देण्यात आल्याचे पत्रात म्हटले आहे.

जहाजांवर काम करणाऱ्यांसाठी दिशानिर्देश जारी
लाखोजण भारतीय मर्चंट शिपिंग जहाजांवर काम करतात. मात्र लॉकडाऊन असल्याने त्यांना जहाजांवर काम करण्यासाठी जाता येत नाही किंवा जहाजावर अडकले आहेत. यामुळे त्यांना आपली नोकरी जाण्याची भीती आहे. याची केंद्राने दखल घेतली असून जहाजावर काम करणाऱ्या भारतीय कामगारांच्या साइन इन आणि साइन ऑफ संबंधी दिशानिर्देश जारी करण्यात आले असल्याचे गृहमंत्रालयाने सांगितले.


कोरोनाबाधितांचा आकडे 21 हजारावर
देशातील कोरना रुग्णांची संख्या 21393 झाली आहे. गेल्या 24 तासात 1409 नवीन रुग्ण आढळले आहेत. कोरोना रुग्ण आढळून आलेल्या आणखी 12 जिल्ह्यांमध्ये गेल्या 28 दिवसात एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही. तसेच 78 जिल्ह्यामध्ये 14 दिवसात एकही नवीन रुग्ण आढळला नाही, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली.