Coronavirus : डोळ्यातूनही होऊ शकतो कोरोनाचा संसर्ग ? चीनमधील डॉक्टरचा दावा

बीजिंग : वृत्तसंस्था – चीनपासून सुरुवात झालेल्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला हादरवून सोडले आहे. ताज्या आकडेवारीनुसार भारतात १२६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. कोरोनाचे सर्वाधिक ३९ रुग्ण महाराष्ट्रात आढळली आहेत. त्यामुळे राज्य सरकार कडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. जिम, शाळा, महाविद्यालये, जलतरण तलाव, महत्वाची मंदिरे, बंद करण्यात आली आहेत. तसेच बऱ्याच खाजगी कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ देत आहेत. कोरोना हा वेगाने पसरणारा आजार आहे. आतापर्यंत कोरोना हा श्वासोच्छवासाद्वारे दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरतो अशी माहिती समोर आली आहे. परंतु आता आणखी एका नवी माहिती समोर आली आहे. या नव्या माहितीनुसार डोळ्यांतून कोरोना विषाणूचा संसर्ग देखील पसरत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

डोळ्यांमुळे कोरोनाच्या विषाणूची लागण झाल्याचा दावा
चीनमधील वृत्तसंकेतस्थळ ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ने दिलेल्या वृत्तानुसार, बीजिंगमधील ज्येष्ठ वैद्यकीय तज्ञ वांग गुआंग्फा यांना डोळ्यामुळे कोरोना विषाणूची लागण झाली असल्याचे म्हटले होते. डॉक्टर वांग हे वुहान येथे कोरोनाबाधित रुग्णाची तपासणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी कोरोनाचा संसर्ग सुरू झाला होता. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी त्यांनी मास्क व इतरही काळजी घेतली होती. मात्र, त्यानंतरही त्यांना कोरोनाची लागण झाली. वांग यांच्या दाव्यानुसार, कदाचित डोळ्यामुळे संसर्ग झाला असेल. रुग्णांची तपासणी करताना त्यांनी कपाळावरील घाम पुसला होता. डोळ्यातून कोरोनाचा संसर्ग झाला असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

माकडांवर केला होता प्रयोग
चीनच्या शास्त्रज्ञांना एका प्रयोगादरम्यान डोळ्यांद्वारे कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो, असे आढळले होते. कोरोनाला अटकाव करणाऱ्या लसीवर शास्त्रज्ञांकडून संशोधन सुरू आहे. यासाठी त्यांनी काही माकडांमध्ये डोळ्यांद्नारे कोरोनाचा व्हायरस सोडला. त्यानंतर त्या माकडाच्या शरीरात कोरोनाचा संसर्ग फैलावला. त्याच्या आधारे कोरोनाचा संसर्ग डोळ्यांद्वारे फैलावण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे. यावर शास्त्रज्ञांकडून अधिक संशोधन सुरू आहे.

डोळ्यातून कोरोनाच्या व्हायरसचा संसर्ग होण्याच्या या दोन घटनांच्या दाव्यांचा अपवाद वगळता इतर कोणतीही अशी प्रकरणे समोर आली नाहीत. त्यामुळे यावर शास्त्रज्ञही अधिक ठोसपणे यावर अधिक भाष्य करण्यास नकार देत आहेत.

कोरोनापासून वाचण्यासाठी काय घ्याल काळजी

१) खोकताना किंवा शिंकताना तोंडावर रुमाल किंवा हात धरायलाच हवा. खरंतर करोनाच्या धास्तीनेच नव्हे तर अन्य वेळाही ही किमान काळजी घेणे आवश्यक आहे, जेणेकरून जंतूसंसर्ग टाळता येतो. न धुतलेल्या हातांनी डोळे, नाक, तोंडाला स्पर्श करू नका.

२) खाण्या-पिण्यापूर्वी हात स्वच्छ धुणे गरजेचे आहे. साबण आणि पाण्याने २० सेकंद हात धुवायला हवेत.

३) भरपूर पाणी पिणे अत्यंत गरजेचे आहे. एकतर उन्हाळा सुरू आहे. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासते. त्यामुळे पाणी भरपूर प्यावे.

४) सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक जाणं टाळा. प्रवास करायचाच असेल तर पुरेशी काळजी घ्या. मोठ्या प्रवासाऐवजी शक्यतो घरातच राहण्यास प्राधान्य द्या. इतरांशी शारीरिक संपर्क टाळा.

५) सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी असल्यास डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय परस्पर औषधे घेऊ नका.