दिलासादायक ! देशातील 430 जिल्ह्यांत गेल्या 28 दिवसांत कोरोनाचा एकही रुग्ण नाही – केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन

पोलीसनामा ऑनलाइन टीम – देशात कोरोनाचा विस्फोट होत असताना सुखावणारी आकडेवारी आता समोर आली आहे. देशात गेल्या 28 दिवसांत तब्बल 430 जिल्ह्यांत कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळला नसल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिली आहे. यामुळे कोरोनाच्या संकटात मोठा दिलासा मिळाला आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन म्हणाले की, देशात कोरोनाबाबतची स्थिती सध्यातरी नियंत्रणात आहे. परिस्थिती नियंत्रणात असली तरी नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. निष्काळजीपणा घातक ठरू शकतो. यामुळे संसर्ग वाढू शकतो. कोरोनाची नियमावली पाळा देखील आरोग्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील 8 राज्ये ही कोरोनाचा हब बनत असून येथे झपाट्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या राज्यांमध्ये एकूण कोरोनाग्रस्तांच्या संख्येची 85 टक्के केसेस आहेत. देशात कोरोना संसर्गाच्या या दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. एक कोरोना संक्रमित व्यक्ती कोणत्याही निर्बंधाशिवाय 30 दिवसांत सरासरी 406 लोकांना संक्रमित करू शकतो. मे 2020 नंतर कोरोनाचा संसर्ग आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूच्या साप्ताहिक घटनांमध्ये सर्वाधिक वाढ दिसून येत आहे. महाराष्ट्रातील एकूण 36 जिल्ह्यांपैकी 25 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रभाव अधिक आहे. देशात मागील एका आठवड्यात आढळून आलेल्या प्रकरणांपैकी 59.8 टक्के रुग्ण याच जिल्ह्यांमधील आहेत, असे म्हटले आहे.

दरम्यान देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 56,211 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 271 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.