पंतप्रधान, आरोग्यमंत्री जबाबदारी झटकताहेत : पी. चिदंबरम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   देशात कोरोनाचे थैमान सुरु आहे. रुग्णसंख्याही झपाट्याने वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्ययंत्रणांवर याचा मोठा ताण येत आहे. त्यावरून आता माजी केंद्रीयमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी भाष्य केले. ‘पंतप्रधान मोदी आणि आरोग्यमंत्र्यांनी आपल्या जबाबदारीपासून हात झटकले आहेत. लोकशाहीच्या तत्त्वांची थट्टा सुरू आहे’, असे ते म्हणाले.

देशात कोरोनाबाधित रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दिवसाला चार लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. त्यानंतर आता पी. चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, ‘कोरोना महामारीची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा हे एक कटू सत्य आहे. पण सरकार हे अजूनही नाकारत आहे. लोकशाहीच्या तत्त्वांची थट्टा सुरू आहे. तामिळनाडूमध्ये 45 वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना पहिला डोसही मिळत नाही. दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. पंतप्रधान मोदी आणि आरोग्यमंत्र्यांनी आपल्या जबाबदारीपासून हात झटकले आहेत’.

आरोग्यमंत्री राजीनामा देणार का?

चिदंबरम यांनी यापूर्वी लसीकरणावर भाष्य केले होते. ‘आरोग्यमंत्र्यांची 1 मे रोजी कसोटी असेल. राज्यांकडे लसींचा मुबलक साठा असल्याचा त्यांचा आणि त्यांच्या सरकारचा दावा हवेत उडून जाईल. कोणतेही राज्य 18 ते 44 वयोगटाच्या लसीकरणासाठी अद्याप तयार नाही. जर लस नाही म्हणून 1 मे नंतर लसीकरण केंद्रांवरुन लोकांना घरी पाठवण्यात आले तर आरोग्यमंत्री राजीनामा देणार का? असे चिदंबरम यांनी म्हटले होते.