धक्कादायक ! 17 लाख खर्चूनही कोरोनामुळे आई-बाबा गमावले, दीड वर्षांच्या चिमुकल्याने दिला मुखाग्नी

नवी दिल्लीः वृत्त संस्था – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत वाढ झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोनामुळे लाखो लोकांना जीव गमवावा लागला आहे. अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. अशीच एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातून समोर आली आहे. कोरोनामुळे एक हसतं-खेळत घर काही दिवसांत उद्ध्वस्त झाले आहे. 7 दिवसांत तब्बल 17 लाख खर्च करूनही एका चिमुकल्यापासून कोरोनाने त्याचे आई-बाबा हिरावले आहेत. अवघ्या दीड वर्षाच्या कोरोनाबाधित चिमुकल्याने आपल्या आई-बाबांना मुखाग्नी दिला आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाहपूर क्षेत्रातील शताब्दीपूरम कॉलनीतील 37 वर्षीय अजय जायसवाल आणि त्यांची 35 वर्षीय पत्नी अंशिका यांना काही दिवसांपूर्वीच कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर त्यांच्या दोन्ही मुलांचीही कोरोना टेस्ट केली. त्यावेळी त्यांची सहा वर्षांची मुलगी गुनगुन आणि दीड वर्षांचा मुलगा आनंदही कोरोना पॉझिटिव्ह आले.या दाम्पत्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पण प्रकृती आणखी गंभीर झाल्याने त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान 7 दिवसांत तब्बल 17 लाख रुपये खर्च केले. पण काहीच फायदा झाला नाही. लाखो रुपये खर्च करूनही कोरानामुळे या दाम्पत्याचा मृत्यू झाला. चिमुकल्यांनी आपल्या आई-वडिलांना गमावले आहे. शनिवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी दीड वर्षाच्या चिमुकल्यानेच आपल्या आईबाबांना मुखाग्नी दिल्याने साऱ्यांचेच डोळे पाणावले होते.