धक्कादायक ! कोरोनाग्रस्ताचा मृतदेह धावत्या वाहनातून रस्त्यावर पडला अन्…

नवी दिल्लीः पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या संकटात अनेक ठिकाणी प्रशासनाचा निष्काळजीपणा दिसून येत असतानाच रुग्णाचा मृतदेह हाताळतांना मोठा हलगर्जीपणा झाल्याचे समोर आले आहे. रुग्णाचा मृतदेह धावत्या वाहनातून रस्त्यावर पडल्याची घटना मध्य प्रदेशात घडली आहे. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. प्राप्त माहितीनुसार, मध्य प्रदेशातील विदिशातील अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेजमधील शव घेऊन जाणाऱ्या वाहनातून कोरोनाग्रस्ताचा मृतदेह हा भर रस्त्यात पडला. लोकांच्या हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी मोठमोठ्याने आवाज देऊन वाहनाला थांबवले. त्यानंतर तो पुन्हा उचलून वाहनात ठेवण्यात आला आणि अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

नियमाप्रमाणे एका वाहनात एकावेळी फक्त 2 मृतदेह ठेवता येतात. पण या वाहनात 3 मृतदेह स्ट्रेचरवर ठेवले होते. धावत्या गाडीमुळे स्ट्रेचर वाहनाच्या दरवाजाला धडकले आणि दरवाजा उघडला गेला. त्यामुळे मृतदेह रस्त्यावर पडला. काही जणांनी वाहनातून मृतदेह खाली पडल्याचे पाहिले. यानंतर त्यांनी जोरजोरात आवाज देऊन चालकाला थांबवले. यानंतर मृतदेह पुन्हा वाहनात ठेवला गेला. या मेडिकल कॉलेजमध्ये यापूर्वीही अशा प्रकारच्या हलगर्जीपणाच्या घटना घडल्या आहेत. 13 एप्रिलला एका कोरोना रुग्णाला 2 वेळा मृत घोषित केले होते. नातेवाईकांना मृत्युचा दाखलाही दिला गेला. कुटुंबातील काही सदस्य अंत्यसंस्कारासाठी स्मशानात गेले. अंत्यसंस्काराची तयारी करू लागले. मृतदेह येण्याची ते वाट पाहत होते. त्याचवेळी फोन आला. रुग्ण जिंवत असल्याचे सांगण्यात आले. श्वास थांबल्याने ही समस्या निर्माण झाल्याचे सांगितले गेले. याबाबतचे वृत्त एका हिंदी वेबसाईटने दिले आहे.