संतापजनक ! ‘लॉकडाऊन’चा फायदा घेत अंध महिलेवर बलात्कार

पोलीसनामा ऑनलाइन टीम – देशभरात कोरोनामुळे लॉकडाउन करण्यात आले असून त्याचा काहीजण गैरफायदा घेत असल्याचे दिसून आले आहे. लॉकडाउन असल्याने लोक आपापल्या घरांमध्ये अडकून पडले आहेत. याचाच फायदा घेत भोपाळमध्ये एका 53 वर्षीय अंध महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित महिला बँकेत मॅनेजर पदावर काम करते. घटनेमुळे घरांमध्ये एकट्या अडकलेल्या असहाय्य महिला, लोकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

भोपाळमध्ये पीडित महिला गेल्या काही दिवसांपासून घरात एकटीच राहत होती. लॉकडाउन जाहीर करण्यात आल्याने महिलेचा पती राजस्थानमधील सिरोही जिल्ह्यातील त्याच्या घरीच अडकलेला आहे. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, झोपेत असताना एक अज्ञात व्यक्ती घरात शिरून त्याने बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांच्या हाती कोणताही धागादोरा लागलेला नाही. प्राथमिक तपासानुसार, आरोपीने दुसर्‍या माळ्यावर पोहोचण्यासाठी पायर्‍यांचा वापर केला असावा आणि यानंतर बाल्कनीतून घरात प्रवेश केल्याची शक्यता पोलीस अधिकारी संजय साहू यांनी वर्तविली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तिथे पोहोचून पाहणी केली. पीडित महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.