Coronavirus : AIIMS च्या एका निवासी डॉक्टरला देखील ‘कोरोना’ची लागण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशभरात कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तींच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. दिल्लीत डॉक्टरांनाच कोरोनाची लागण होण्याच्या घटना वारंवार समोर येत असताना आता दिल्लीतील एम्स मधील एका डॉक्टरना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. याबाबतचे वृत्त नुकतेच ए.एन. आय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की , दिल्ली येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स),च्या फिजिओलॉजी विभागाच्या निवासी डॉक्टरची कोविड -१९ ची चाचणी पॉझिटिव्ह आढळून आली आहे. पुढील उपचाराकरिता आणि चाचण्यांकरिता त्यांना नवीन खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार ते हौज राणी मालवीय नगर येथे राहतात.

डीटीसी बसमधून ये -जा करीत होते डॉक्टर

कोरोना विषाणूच्या संसर्गामध्ये अडकलेले डॉक्टर गेल्या काही दिवसांपासून फक्त दिल्ली परिवहन महामंडळाच्या बसमधून घरून रुग्णालयात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत त्यांच्याबरोबर बसमध्ये येणारे डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ यांचीही तपासणी करण्यात येत आहे . त्यांच्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील व्यक्तींना , तसेच रुग्णांना किंवा रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे का ? याची तपासणी करण्यात येत आहे.

दिल्लीमध्ये डॉक्टरच कोरोनाव्हायरसच्या संसर्गाच्या विळख्यात

दरम्यान यापूर्वी देखील दिल्ली येथील मोहल्ला क्लीनिक मध्ये उपचार देणाऱ्या डॉक्टरनाच कोरोनाची लागण झाली आहे. तसेच कॅन्सर हॉस्पिटल मधील फिजिओलॉजी विभागाच्या निवासी डॉक्टरना देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती असताना आता एम्स च्या डॉक्टर ना देखील लागण झाल्याची बाब समोर आली आहे.

या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. कोरोना व्हायरसचा वाढता प्रकोप बघता सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाच्या गंभीर परिस्थितीशी लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २१ दिवसांचा लॉक डाऊन जाहीर केला आहे. पण अशा परिस्थितीत स्वतःचा जीव धोक्यात घालून पोलीस , स्वच्छता दूत , आरोग्य सेवेतील कर्मचारी , तसेच काही सरकारी कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहेत.