भारताला सुवर्णपदक जिंकून देणार्‍या ‘या’ खेळाडूची प्रकृती ‘नाजूक’, लॉकडाऊनमुळे मिळत नाहीत ‘उपचार’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनामुळे भारतात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे विमान, रेल्वे सेवा बंद आहेत. यामुळे एका भारतीय खेळाडूला मृत्यूशी झुंज द्यावी लागत आहे. आशियाई चॅम्पियन बॉक्सर डिंग्को सिंह कॅन्सरग्रस्त असून, लॉकडाऊनमुळे सध्या त्याचे उपचार थांबले आहेत.
बँकॉकमध्ये 1998 ला झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत डिंग्कोने भारतासाठी सुवर्णपदक जिंकले होते. मात्र आता त्याला जगण्यासाठी झगडावे लागत आहे. डिंग्कोला यकृताचा कर्करोग झाला आहे. त्याच्यावर दिल्ली येथे उपचार सुरू आहे, मात्र सध्या इम्फाल येथे आपल्या राहत्या घरी आहे. काही दिवसांपासून डिंग्को प्रकृती अस्थिर आहे. त्याला केमोथेरपीसाठी दिल्लीला जायचे आहे. मात्र विमानसेवा बंद असल्यामुळे, त्याला दिल्लीला जाता येत नाही आहे.

डिंग्कोला 24 मार्च ते 19 एप्रिल दरम्यान तीनवेळा विमानाचे तिकीट देण्यात आले होते. मात्र तिन्हीवेळा हे विमान रद्द झाले. डिंग्को यांची पत्नी सध्या आपल्या पतीची काळजी घेत असली तरी, त्यांना उपचारासाठी दिल्लीला घेऊन जाणे गरजेचे आहे. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांचा अनाथाश्रमात राहावे लागले. तेथूनच त्यांनी बॉक्सिंगला सुरुवात केली. बँकॉकमध्ये 1998ला झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर 2013मध्ये पद्मश्री पुरस्काराने भारत सरकारने त्यांना सन्मानही केला.

काही वर्षांपासून यकृताच्या कर्करोगामुळे डिंग्को यांची प्रकृती खराब आहे. केमोथेरपीसाठी त्यांना दिल्ली गाठायची होती, मात्र कोरोनामुळे त्यांचे उपचारही थांबले आहे. 10 मार्च रोजी ते दिल्लीहून इम्फालला परतले, त्यानंतर 25 मार्च रोजी ते दिल्लीला जाणार होते, मात्र 24 मार्चपासून लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्यामुळे डिंग्को यांचा सध्या जीवन-मृत्यूशी लढा सुरू आहे. डिंग्को यांच्या पत्नीने भारत सरकारकडे मदतीची मागणीही केली आहे.